पुरोगामित्वासाठी ‘शेकाप’ बळकट करा

By Admin | Published: February 14, 2016 12:56 AM2016-02-14T00:56:36+5:302016-02-14T00:56:36+5:30

जयंत पाटील : कार्यकर्त्यांचा मेळावा; जातीयवादी पक्षांकडून गोरगरिबांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न

Strengthen the 'pseil' for progress | पुरोगामित्वासाठी ‘शेकाप’ बळकट करा

पुरोगामित्वासाठी ‘शेकाप’ बळकट करा

googlenewsNext

कोल्हापूर : धार्मिकता व जातीयवादी पक्षांनी सत्ता हातात घेऊन गोरगरीब व श्रमजीवींना उद्ध्वस्त करण्याचा विडाच उचलला आहे. त्यामुळे डाव्या विचारांच्या पक्षांची आवश्यकता भासत असून यासाठी शेतकरी कामगार पक्ष बळकट झाला पाहिजे, असे प्रतिपादन पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी शनिवारी येथे केले.
टेंबे रोडवरील पक्षाच्या कार्यालयात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार संपतराव पवार-पाटील होते.
आमदार जयंत पाटील म्हणाले, महागाईचा उच्चांक गाठला जात आहे. तसेच जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी या सरकारकडून धार्मिक मुद्दे उपस्थित केले जात आहेत. याच विषयांवर वृत्तवाहिन्यांवर चर्चासत्रे होत आहेत. म्हणून गोरगरीब, कष्टकरी व श्रमजीवींचे प्रश्न सोडविण्यासाठी डाव्यांशिवाय कुणीच नाही.
ते पुढे म्हणाले, हे सरकार आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करण्यापेक्षा त्यांच्या करुणेची प्रसिद्धी करून शेतकऱ्यांना बदनाम करीत आहे. दुष्काळी मराठवाड्यात शेकापक्षाने स्वखर्चाने चार कोटी खर्च करून कालवा तयार केला आहे. एक हजार शेतकऱ्यांना दिवाळी भेट दिली. मराठवाडा विद्यापीठातील एक हजार विद्यार्थ्यांना दररोज जेवण दिले जात आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना फक्त आर्थिकच नव्हे तर इतर छोटे-छोटे व्यवसाय पक्षाने उभारून दिले आहेत; पण याची कुठेही जाहिरात वा बातमी करून शेकापने शेतकऱ्यांच्या दुर्दैवी गरिबीचे प्रदर्शन केले नाही.
भाजप सरकारने बाजार समितीला पर्याय म्हणून खासगी मार्केट उभारण्याचा निर्णय घेऊन समितीचे अस्तित्वच नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे शेतीमालाचा दर खासगी मार्केटवाल्या अडत्यांच्या मनावरच ठरणार आहे. शासनाच्या या जनताविरोधी कृत्यांवर शेका पक्षानेच आवाज उठविला पाहिजे.
संपतराव पवार-पाटील म्हणाले, शासनाचे जनताविरोधी निर्णय लोकांपर्यंत पक्ष कार्यकर्त्यांनी पोहोचवून त्यांची फसवाफसवी समोर आणावी.
अजित देसाई, डॉ. संपत पाटील, अंबाजी पाटील, पी. एस. पाटील, अण्णासाहेब पाटील, शिवाजीराव साळुंखे, नारायण जाधव, पांडुरंग पाटील, संतराम पाटील, राजेंद्र पाटील, चंद्रकांत बागडी, रवी पाटील, शरद नलवडे, आदींनी मनोगत व्यक्त केले.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब देवकर यांनी स्वागत केले. जनार्दन जाधव यांनी आभार मानले. यावेळी भारत पाटील, बाबूराव कदम, दिगंबर लोहार, अशोकराव पवार-पाटील, केरबा पाटील, एकनाथ पाटील, विश्वास वरुटे, डी. पी. कांबळे, संभाजी पाटील, अमित कांबळे, सरदार पाटील, मोहन पाटील, अस्लम बागवान, मेहजबीन शेख, समर पवार-पाटील, दत्ता पाटील, डॉ. सुभाष पाटील, आदी उपस्थित होते.

Web Title: Strengthen the 'pseil' for progress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.