बालिंगा पुलाच्या मजबुतीकरणाचे काम रखडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:31 AM2021-06-16T04:31:54+5:302021-06-16T04:31:54+5:30
कोपार्डे : कोल्हापूर - गगनबावडा मार्गावरील बालिंगा येथे असणाऱ्या भोगावती नदीवरील पुलाच्या मजबुतीकरणाचे काम एक महिन्यापूर्वी सुरू झाले ...
कोपार्डे : कोल्हापूर - गगनबावडा मार्गावरील बालिंगा येथे असणाऱ्या भोगावती नदीवरील पुलाच्या मजबुतीकरणाचे काम एक महिन्यापूर्वी सुरू झाले होते. पण अचानक पावसाने सुरुवात केल्याने नदीपात्रात असणाऱ्या पिलरच्या मजबुतीकरणासाठी अडथळे येणार आहेत. यामुळे याहीवर्षी बालिंगा पुलाच्या मजबुतीकरणाचे काम रखडणार आहे.
कोल्हापूर - गगनबावडा मार्गावर कोल्हापूर व कोकणाला जोडणारा पूल म्हणून बालिंगा येथील भोगावती नदीवर ब्रिटीशकालीन रिव्हज पुलाला महत्त्व आहे. १८८५ला हा पूल उभारण्यात आला. १३५ वर्षांचे वयोमान असणाऱ्या या पुलाच्या वरच्या बाजूला रस्त्यासाठी २००१मध्ये रिबारिंग करून रुंदीकरण करण्यात आले होते. यावेळी या पुलाच्या पायाची व पिलरची क्षमता व इतर बाबीची चाचणी घेण्यात आली. यावेळी पूल मजबूत असल्याचे निदर्शनास आले होते.
मात्र, २०१९ मध्ये सावित्री नदीवरील पूल प्रचंड महापुराने वाहून गेल्यानंतर संपूर्ण राज्यातील ब्रिटीशकालीन पुलांंचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. यात कोल्हापूर जिल्ह्यातील सात ब्रिटाशकालीन पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. यात बालिंगा पुलाचेही ऑडिट झाले. त्यावेळी पूल मजबूत असल्याचा अहवाल आला होता. पण काही ठिकाणी दगड निखळले आहेत तर पिलरला असणाऱ्या दोन दगडांच्या फटीतील सिमेंट निखळून मोठ्या फटी निर्माण झाल्याचे निरिक्षणात लक्षात आल्यानंतर त्याचे मायक्रो सिस्टीमने अंडरवॉटर काम होणार होते.
यासाठी एक महिन्यापूर्वी काम सुरू करण्यात आले होते. नदीच्या मध्यभागी असणाऱ्या दोन पिलरला जॅकेट कोटींग करण्यासाठी सभोवती स्लँट मारण्यात आले होते. पण पावसाने सुरुवात केल्याने आता हे काम रखडणार आहे.
फोटो
: १४ बालिंगा पूल