कोल्हापुरातील कळंबा कारागृहाच्या सुरक्षेला बळकटी, तटबंदीवरील जाळीचे काम सुरू
By उद्धव गोडसे | Published: March 12, 2024 03:44 PM2024-03-12T15:44:07+5:302024-03-12T15:45:16+5:30
कळंबा मध्यवर्ती कारागृहात दोन हजाराहून अधिक कैदी
कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहाची सुरक्षा बळकट करण्यासाठी मुख्य तटबंदीवर लोखंडी जाळीचे कूंपन उभारण्यासह भिंतीची दुरुस्ती आणि भिंतीलगतच्या रस्त्यांची कामे सुरू झाली. विक्री केंद्र, विश्रामगृह इमारतीच्या कोनशिलेसह कार वॉशिंग सेंटरचे उद्घाटन कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पाटील यांच्या हस्ते मंगळवारी (दि. १२) झाले.
कळंबा मध्यवर्ती कारागृहात दोन हजाराहून अधिक कैदी शिक्षा भोगतात. राज्यातील कुख्यात टोळ्यांमधील गुन्हेगार आणि देश-विदेशातील गुन्हेगारांचाही यात समावेश असतो. तटबंदीवरून कैद्यांसाठी गांजा, मोबाइल पुरवण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. अशा घटना रोखून कारागृहाची सुरक्षा भक्कम करण्यासाठी कारागृह प्रशासनाने काही प्रस्ताव राज्य शासन आणि जिल्हा नियोजन समितीकडे पाठवले होते.
त्यानुसार मुख्य तटबंदीच्या भिंतीची दुरुस्ती, त्यावर पाच फुटांच्या जाळीचे कूंपन उभारणे, भिंतीलगत बाहेर सिमेंटचा रस्ता तयार करणे, आतून डांबरी रस्ता तयार करणे, कैद्यांच्या वस्तूंसाठी विक्री केंद्राची इमारत तयार करणे, अधिकारी, कर्मचा-यांसाठी विश्रामगृह आणि नावीन्यपूर्ण उपक्रमातून कार वॉशिंग सेंटर सुरू करण्यास परवानगी मिळाली होती. त्यापैकी कार वॉशिंग सुरू झाले असून, उपमहानिरीक्षक साठे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ते आणि भिंत दुरुस्तीची कामे होणार आहेत. याचेही उद्घाटन अधिका-यांच्या हस्ते झाले.
यावेळी प्रभारी कारागृह अधीक्षक पांडुरंग भुसारे, उपअधीक्षक साहेबराव आडे, तुरुंग अधिकारी चंद्रशेखर देवकर, सतीश कदम, सोमनाथ मस्के, एस. एस. वाघ, विठ्ठल शिंदे, प्रशासन अधिकारी अरुण डेरे, आदी उपस्थित होते.
कैद्यांकडून कार वॉशिंग
कळंबा कारागृहाबाहेर सुरू केलेल्या कार वॉशिंग सेंटरमध्ये अत्याधुनिक साधनसामग्री उपलब्ध आहे. नागरिकांना माफक दरात त्यांच्या कारचे वॉशिंग करून दिले जाणार आहे. कारागृहातील कैदीच वॉशिंग सेंटरवर काम करणार आहेत, अशी माहिती प्रभारी अधीक्षक भुसारे यांनी दिली.
साठे यांच्याकडून कारागृहांची तपासणी
उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी सोमवारी बिंदू चौक सबजेलची वार्षिक तपासणी केली. मंगळवारी कळंबा कारागृहाची वार्षिक तपासणी करून त्यांनी सर्व अधिका-यांशी संवाद साधला. कारागृहात कैद्यांकडून कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी अधिका-यांना दिल्या.