बंद केलेल्या रस्त्यावरून ‘बाराइमाम’मध्ये तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 06:03 PM2019-08-29T18:03:21+5:302019-08-29T18:05:04+5:30
बिंदू चौक उपकारागृहाला लागून असणारा रस्ता बाराइमाम परिसरातील नागरिकांनी बंद केला असून, तो तत्काळ खुला करावा अन्यथा आम्ही जाऊन तो खुला करू, असा इशारा आझाद गल्लीतील नागरिकांनी दिल्यामुळे गुरुवारी काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले. दोन्ही बाजूंनी मोठा जमाव जमल्यामुळे पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, हा रस्ता दोन दिवसांत खुला करण्यात येईल, असे आश्वासन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर जमाव पांगला.
कोल्हापूर : बिंदू चौक उपकारागृहाला लागून असणारा रस्ता बाराइमाम परिसरातील नागरिकांनी बंद केला असून, तो तत्काळ खुला करावा अन्यथा आम्ही जाऊन तो खुला करू, असा इशारा आझाद गल्लीतील नागरिकांनी दिल्यामुळे गुरुवारी काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले. दोन्ही बाजूंनी मोठा जमाव जमल्यामुळे पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, हा रस्ता दोन दिवसांत खुला करण्यात येईल, असे आश्वासन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर जमाव पांगला.
शहरातील बिंदू चौक उपकारागृहाला लागून एक छोटा रस्ता आहे. तो बाराइमाम परिसरातून बालगोपाल तालीम येथे मिळतो. या रस्त्यावर सायकल, दुचाकी वाहने तसेच आॅटो रिक्षा अशी वाहने जातात. त्यावेळी कोणा नागरिकांचा विरोध झाला नाही; परंतु बिंदू चौक ते देवल क्लबपर्यंतचा रस्ता एकेरी करण्यात आल्यानंतर शॉर्टकट म्हणून कारागृहाला लागून असलेल्या रस्त्यावरून जाण्यास वाहनधारकांनी प्राधान्य दिले. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक वाढली. त्याचा त्रास होतो म्हणून हा रस्ताच बाराइमाममधील नागरिकांनी बंद केला.
शेजारच्या आझाद गल्लीतील नागरिकांनी त्याला तीव्र आक्षेप घेऊन हा रस्ता वाहतुकीस खुला करा, अशी मागणी केली. याबाबत शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना वारंवार सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे दोनच दिवसांपूर्वी नागरिकांनी सरनोबत तसेच पोलिसांना निवेदन देऊन जर येत्या २४ तासांत रस्ता खुला केला नाही तर आम्ही आत घुसून तो खुला करणार असून, जर परिस्थिती चिघळली तर त्याला प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा दिला. त्यामुळे सकाळी ११.३० वाजता मोठ्या संख्येने पोलीस तेथे जमले. आझाद गल्ली व बाराइमाम येथील नागरिक आमनेसामने आले. त्यामध्ये महिलांचाही समावेश होता; त्यामुळे तेथे तणाव निर्माण झाला.
पोलिसांनी दोन्ही जमावांना शांत राहण्याचे आवाहन केले. त्या ठिकाणी शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयाचे उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण आले. त्यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले आणि दोन दिवसांत हा रस्ता खुला करून देतो, असे आश्वासन दिले. जर दोन दिवसांत कार्यवाही झाली नाही, तर आम्हीच रस्ता खुला करणार; तसेच महापालिकेच्या विरोधात गुन्हे दाखल करणार, असा इशारा अवधूत भाटे यांनी दिला. अधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेरसुद्धा देण्यात येईल, असे भाटे यांनी सांगितले.
बाराइमाममधील नागरिकांच्या वतीने माजी नगरसेवक आदिल फरास उपस्थित होते; तर आझाद गल्लीतील अवधूत भाटे, संजय साडविलकर, महेश उरसाल, विजय करजगार, अजित पोवार, विक्रम भोसले, विराज ओतारी, सौरभ देशमुख, विशाल जाधव, मंगल भाटे, गौरी चव्हाण, सरला कोल्हे, माणिक जाधव, सुरेश काकडे उपस्थित होते.