कर्नाटकच्या नियमामुळे सीपीआरवर ताण, स्वॅबसाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:39 AM2021-02-23T04:39:43+5:302021-02-23T04:39:43+5:30
कोल्हापूर : कर्नाटकात कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल सोबत असल्याशिवाय प्रवेश दिला जात नसल्याने येथील सीपीआर रुग्णालयावरील ...
कोल्हापूर : कर्नाटकात कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल सोबत असल्याशिवाय प्रवेश दिला जात नसल्याने येथील सीपीआर रुग्णालयावरील ताण वाढला आहे. पुण्या, मुंबईहून येणारे अनेकजण या तपासणीसाठी आता सीपीआरकडे येत आहेत. सकाळी ९ ते दुपारी १२ या तीन तासात तब्बल ७० जणांनी आपली तपासणी करून घेतली आहे. दरम्यान, राज्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने ग्रामीण भागातही पुन्हा सर्वेक्षणे करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेने दिल्या आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून कर्नाटक शासनाने कोरोनाचा ७२ तासांमधील निगेटिव्ह अहवाल सोबत असल्याशिवाय प्रवेश देणार नाही, असे जाहीर केले आहे. तसा फलक कोगनोळी टोलनाक्यावर लावण्यात आला आहे. त्यामुळे कर्नाटकात जाणाऱ्यांनी कोरोना तपासणीला प्राधान्य दिले आहे. कागल येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून, या ठिकाणीही कोरोनाची याआधी चाचणी केली जात होती. मात्र ही यंत्रणा सध्या शिथिल पडली होती. त्यामुळे नागरिक आता कोगनोळी टोलनाक्यावरून थेट सीपीआरमध्ये तपासणीसाठी येत आहेत. त्यामुळे याचा ताण सीपीआरच्या तपासणी पथकावर पडला आहे. अनेकांनी आपल्या वाहनांसह सीपीआर गाठल्याने या ठिकाणी वाहनांचीही मोठी गर्दी झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने कमी आल्यामुळे आरोग्य संस्थांही थोड्या निवांत होत्या. त्यामुळे सर्वेक्षण, कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगही फार प्रभावीपणे सुरू नव्हते. जे पाझिटिव्ह येतील, त्यांच्यावर उपचार सुरू करण्यालाच अधिक प्राधान्य दिले जात होते. मात्र राज्यातच कोरोनाग्रस्तांचा आकडा पुन्हा वाढू लागल्याने पुन्हा सर्वेक्षणाच्या सूचना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिल्या आहेत.
चौकट
यांचे होणार सर्वेक्षण
१ ज्यांना सर्दी, पडसे, खोकला, ताप आहे
२ ज्यांना श्वास घेताना अडचण येते
३ ज्यांना आधीपासून काही व्याधी आहेत
चौकट
१ पुन्हा केले जाणार कन्टोन्मेंट झोन
२ पुन्हा कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग करावे लागणार
३ सर्व आरोग्य संस्थांना सज्ज राहण्याच्या सूचना
४ ग्रामपंचायतींनीही सतर्क राहण्याचे आदेश
कोट
जिल्ह्याील सर्व प्राथमिक आरोग्य केंदे आणि संस्थांना दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. शासनाच्या सूचनेनुसार जी सर्वेक्षणे करणे बंधनकारक करण्यात आले आहे ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्येेष्ठ नागरिकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे.
डॉ. योगेश साळे
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर