निवासी डॉक्टरांवर कोविडसह शिक्षणाचाही ताण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:25 AM2021-03-31T04:25:01+5:302021-03-31T04:25:01+5:30
कोल्हापूर : मागील वर्ष कोरोनात गेले. आता यंदाचेही वर्ष कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये जाऊन शैक्षणिक नुकसान होईल, अशी भीती कोल्हापुरात ...
कोल्हापूर : मागील वर्ष कोरोनात गेले. आता यंदाचेही वर्ष कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये जाऊन शैक्षणिक नुकसान होईल, अशी भीती कोल्हापुरात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भावी डॉक्टरांना वाटत आहे. कोविडबाबतच्या कामासह शिक्षणाचा ताण त्यांच्यावर आला आहे. अतिरिक्त डॉक्टरांची भरती करून आमच्यावरील ताण कमी करावा, अशी मागणी या निवासी डॉक्टरांकडून होत आहे.
येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सध्या ८६ निवासी डॉक्टर्स आहेत. त्यात सर्जरी, मेडिसीन, स्त्रीरोग, बालरोग, कान-नाक-घसा, भूलरोग, आदी विषयांमधील एक विषय विशेष म्हणून निवडून त्याचे शिक्षण घेत आहेत. गेल्यावर्षी कोरोनामुळे त्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला. आतादेखील अशीच परिस्थिती निर्माण होण्याचे चित्र आहे. छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात (सीपीआर) हृदयरोग, मधुमेह, मेंदुरोग, आदी विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथून रुग्ण येतात. त्यात बहुतांश रुग्ण हे सर्वसामान्य, गरीब कुटुंबांतील असतात. सीपीआरमध्ये केवळ कोविड रुग्णांवर उपचार करणे सुरू केल्यास त्याचा फटका या रुग्णांसह वैद्यकीय अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बसणार आहे. प्रात्यक्षिकांचे आवश्यक तेवढे ज्ञान मिळणार नाही. कोविड रुग्णांना अथवा कोविड वॉर्डमध्ये सेवा देण्यास आमचा विरोध नाही. मात्र, आम्हाला आमच्या विषयाचे परिपूर्ण ज्ञान मिळायला हवे, अशी मागणी या निवासी डॉक्टरांची आहे.
प्रतिक्रिया
गेल्यावर्षी आम्हाला कोविडचे काम अहोरात्र करावे लागले. यंदाही असे काम करावे लागेल, अशी भीती आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या विशेष विषयाचे ज्ञान कधी मिळणार, हा प्रश्न आहे. आम्हाला परिपक्व डॉक्टर व्हायचे असून, त्यासाठी आम्ही वैद्यकीय शिक्षण घेत आहोत. त्यामुळे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने पर्यायी व्यवस्था करावी. अतिरिक्त डॉक्टर उपलब्ध करून आमच्यावरील ताण कमी करावा.
- श्रीकृष्ण कमठाणकर, जिल्हा अध्यक्ष, मार्ड संघटना.
प्रतिक्रिया
मेडिसीनची मी विद्यार्थिनी आहे. गेल्यावेळी कोविड वॉर्डमध्ये काम करावे लागले. मला कोरोनाची लागण झाली होती. पुढील करिअरच्यादृष्टीने यंदाचे अंतिम वर्ष माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे आम्हाला अभ्यासाला वेळ मिळावा.
- नैना राजन, विद्यार्थिनी.
सीपीआरमध्ये नॉन कोविड रुग्णांवरील उपचार बंद झाल्यास सर्जरी थांबणार आहेत. त्याचा फटका रुग्णांसह सर्जरी हा विशेष विषय असणाऱ्या विद्यार्थ्यांना बसणार आहे. गेल्यावर्षी राष्ट्रीय आपत्ती म्हणून आम्ही योगदान दिले. आता आमच्या अंतिम वर्षात शैक्षणिक नुकसान आम्हाला परवडणारे नाही. त्याचा विचार शासनाने करावा.
- अनमोल तलवार, विद्यार्थी.
भूलरोग तज्ज्ञ अभ्यासक्रमाचा मी विद्यार्थी आहे. शस्त्रक्रिया थांबल्यास आमच्या शिक्षणावर मर्यादा येणार आहेत. ते टाळण्यासाठी अतिरिक्त डॉक्टर्सची नियुक्ती करावी.
- हरिशकुमार, विद्यार्थी.
चौकट
लवकर पाऊले उचलावीत
कोविडची दुसरी लाट येणार, याची शासनाला माहिती होती. सध्या कोल्हापुरातील कोविडची रुग्णसंख्या कमी आहे. ती वाढण्यापूर्वी प्रशासनाने अतिरिक्त डॉक्टरांची भरती करावी. कोविड वॉर्डला जास्त कर्मचारी द्यावेत. आमच्यावरील ताण कमी करण्यासाठी प्रशासनाने लवकर पाऊले उचलावीत, अशी मागणी या निवासी डॉक्टरांनी केली.
पॉईंटर्स
जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टर्स : ८६
कोविड वॉर्डात ड्युटी असलेले डॉक्टर्स : १५
महाविद्यालयात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी : ७००
===Photopath===
300321\30kol_1_30032021_5.jpg
===Caption===
(३००३२०२१-कोल-मेडिकल कॉलेज डमी)