‘ओव्हरलोड’ वाहतुकीचा शिरोळच्या रस्त्यांना ताण
By admin | Published: January 5, 2016 11:40 PM2016-01-05T23:40:33+5:302016-01-06T00:44:30+5:30
कोट्यवधी रूपयांचे रस्ते खड्ड्यात : प्रादेशिक परिवहन विभागाचे दुर्लक्ष
जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यात ओव्हरलोड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या वाहतुकीमुळे कोट्यवधी रुपये खर्च केलेले रस्ते खराब होत आहेत. बॉक्साईट, वाळू, माती, वीट, कोळसा, लाकूड याची बिनदिक्कतपणे प्रमाणापेक्षा अधिक वाहतूक होत आहे. प्रादेशिक परिवहन विभागाच्या दुर्लक्षामुळेच ही वाहतूक होत असल्याची चर्चा आहे.
सांगली जिल्हा आणि कर्नाटक सीमा भागाशी निगडित असणारा शिरोळ तालुका दळणवळणाच्या दृष्टिकोनातून वाहनधारकांना सोयीस्कर ठरला आहे. कर्नाटकातून चोरटी वाहतूक या भागात मोठ्या प्रमाणात होत आहे.
सध्या प्रमाणापेक्षा अधिक वाहतूक करणारी वाहनांची संख्या वाढली आहे. यावर स्थानिक पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस ‘चिरीमिरीत’ गुंतले असल्याचे चित्र आहे. तालुक्यात वीटभट्टीबरोबरच माती, वाळू, दगड व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहेत. कर्नाटकातून बॉक्साईट, लाकूड वाहतूकही तालुक्यातून होते. अवजड वाहनांमुळे कोट्यवधी रुपये खर्च करून बनविलेल्या रस्त्यांची दुर्दशा होत आहे. स्थानिक पोलिसांबरोबर प्रादेशिक परिवहन विभागाचे या वाहतुकीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष होत असल्यामुळेच अशी वाहतूक फोफावली आहे. एखादी अपघाताची मोठी घटना घडल्यानंतरच कारवाईचे सोंग संबंधित विभागाकडून घेतले जाते, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’प्रमाणे अशी वाहतूक पुन्हा सुरू होते. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या अशा वाहनांवर ठोस कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
महसूल लाखात; नुकसान कोटीत
वाळू, वीट, माती, दगड यातून शासनाला महसूल मिळतो. ज्या गावातून खनिज उत्खनन केले जाते त्या ठिकाणी लाखो रूपयांत महसूल मिळतो. एकूणच खनिज उत्खननातून मिळणारा महसूल आणि कोट्यवधी रूपये खर्च करून तयार करण्यात आलेले रस्ते याचा विचार करता महसूल लाखात आणि रस्त्यांचे नुकसान कोटीचे अशी परिस्थिती आहे. लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर अंकुश ठेवल्यास अशा वाहतुकीला आळा बसणार आहे.
कर्नाटक, सांगलीतून वाहतूक
सांगली जिल्ह्यातील मिरज-अर्जुनवाड हद्दीतून तर कर्नाटकातून कागवाड-गणेशवाडी, जुगुळ-आलास, एकसंबा-जुने दानवाड, मलिकवाड-दत्तवाड, बोरगाव-हेरवाड या मार्गावरून शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. ओव्हर लोड वाहतूक करण्यासाठी सोयीस्कर रस्ते असल्यामुळे कर्नाटकातील वाळू, बॉक्साईट, विटांची प्रमाणापेक्षा जास्त वाहतूक राजरोसपणे होत आहे. ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहनावर नंबर प्लेटच नाहीत, याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.