‘सीबीएस’वर हातगाड्या हटविताना तणाव, जोरदार खडाजंगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 05:52 PM2019-12-20T17:52:51+5:302019-12-20T17:55:02+5:30
कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक (सीबीएस) येथील इन आणि आउटच्या प्रवेशद्वारांलागतच हातगाड्या लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी येथील हातगाड्या हटविण्यासाठी महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक आले. यावेळी फेरीवाले आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. सुमारे तीन तास येथील वातावरण तणावपूर्ण झाले होते. यावेळी ३३ हातगाड्या हटविण्यात आल्या. पुनर्वसनासंदर्भात चार दिवसांत बैठक घेतली नाही तर पुन्हा याच ठिकाणी हातगाड्या लावण्यात येतील, असा इशारा फेरीवाल्यांनी दिल्या.
कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानक (सीबीएस) येथील इन आणि आउटच्या प्रवेशद्वारांलागतच हातगाड्या लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी येथील हातगाड्या हटविण्यासाठी महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक आले. यावेळी फेरीवाले आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. सुमारे तीन तास येथील वातावरण तणावपूर्ण झाले होते. यावेळी ३३ हातगाड्या हटविण्यात आल्या. पुनर्वसनासंदर्भात चार दिवसांत बैठक घेतली नाही तर पुन्हा याच ठिकाणी हातगाड्या लावण्यात येतील, असा इशारा फेरीवाल्यांनी दिल्या.
शहर वाहतूक शाखा आणि महापालिका प्रशासन यांच्यामध्ये मागील आठवड्यामध्ये झालेल्या बैठकीत मध्यवर्ती बसस्थानक येथील इन आणि आउटच्या प्रवेशद्वारालगत असणाऱ्या हातगाड्या हटविण्याचा निर्णय झाला होता. यानुसार महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक शुक्रवारी सकाळी ११च्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आले. यावेळी कारवाई करताना फेरीवाल्यांनी जोरदार विरोध केला. महापालिकेचे उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, इस्टेट अधिकारी प्रमोद बराले, अतिक्रमण निर्मूलन पथकप्रमुख पंडित पवार आणि फेरीवाले संघटनेचे दिलीप पवार, रघू कांबळे यांच्यात वादावादी झाली.
घाटगे म्हणाले, मध्यवर्ती बसस्थानकाच्या सुरक्षा भिंतीलगतच्या सर्व फेरीवाल्यांचे तात्पुरते जेम्स स्टोन येथील गल्लीमध्ये पुनर्वसन करण्यात येईल. दरम्यान, महापालिकेमध्ये फेरीवाले, प्रशासन यांची चार दिवसांत बैठक घेऊन कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला जाईल. याला काही फेरीवाल्यांना विरोध केला. यावर घाटगे यांनी जेम्स स्टोन येथील बंद असणाऱ्या गाड्या जप्त करण्याची भूमिका घेतली.
दरम्यान, वटेश्वर मंदिर येथील हातगाड्या हटविल्यामुळे पुन्हा फेरीवाले आक्रमक झाले. याच ठिकाणी ठिय्या आंदोलन केले. यानंतर एका फळविके्रत्याची हातगाडी जप्त करताना जोरदार खडाजंगी झाली. अखेर २४ किंवा २७ डिसेंबर रोजी फेरीवाल्यांची बैठक घेऊन पर्यायी जागेवर निर्णय घेतला जाईल, अशी प्रशासनाने ग्वाही दिली. बैठक घेतली नाही तर पुन्हा याच ठिकाणी गाड्या लावू, असा इशारा फेरीवाल्यांनी दिला. यानंतर परिसरातील ३३ हातगाड्या हटविण्यात आल्या.