सीपीआरमधील बाह्यरुग्ण विभागामुळे सेवा रुग्णालयावर ताण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:21 AM2021-04-13T04:21:54+5:302021-04-13T04:21:54+5:30
दीपक जाधव कदमवाडी : कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय हे राखीव ठेवल्याने तेथे येणारे नॉन कोविड ...
दीपक जाधव
कदमवाडी : कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय हे राखीव ठेवल्याने तेथे येणारे नॉन कोविड रुग्णसेवा रुग्णालयात पाठविण्यात येत आहेत. मात्र, सेवा रुग्णालयात अपुरा कर्मचारीवर्ग असल्याने येथील यंत्रणेवर ताण आल्याचे चित्र आहे. त्यामुळे हा ताण कमी करण्यासाठी सीपीआरमधील अधिकचा कर्मचारी वर्ग सेवा रुग्णालयात देण्यात यावा, अशी मागणी होत आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी पूर्णवेळ विलीनीकरण रुग्णालय आवश्यक असल्याने छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय हे पुढील दहा दिवसांनंतर कोविड रुग्णालय करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतेच दिले होते. त्यानंतर सीपीआरमध्ये येणारे नॉन कोविड रुग्णसेवा रुग्णालयात पाठविण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, या रुग्णालयात सध्या डॉक्टर व कर्मचारी मिळून ४६ कर्मचारी वर्ग आहे. येथे आधीच अपुरा कर्मचारी वर्ग आहे. त्यातच सीपीआरमधील अधिकच्या रुग्णांचा ताण येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर पडला आहे. सेवा रुग्णालयात तज्ज्ञ डाॅक्टरांबरोबरच नर्सेस व वाॅर्डबाॅयची गरज आहे. सेवा रुग्णालयाकडे आस्थिरोग तज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ नसल्याने रुग्णाची गैरसोय होणार आहे. सध्या सीपीआर कोविड रुग्णालय केल्याने येथील बाह्यरुग्ण विभागातील डाॅक्टर व कर्मचारी सेवा रुग्णालयाकडे वर्ग करणे गरजेच आहे.
याची आहे आवश्यकता
सेवा रुग्णालयात सीपीआरचा बाह्यरुग्ण विभाग सुरू झाल्यास इथे मनुष्यबळ वाढविणे गरजेचे आहे. अपघात विभागासाठी २० कर्मचारी, २० वैद्यकीय अधिकारी व २० नर्सेस व वाॅर्डबाॅयची गरज आहे. दरम्यान, सेवा रुग्णालयात लसीकरण कक्षही सुरू आहे. सीपीआरचा बाह्यरुग्ण विभाग सुरू झाल्यानंतर लसीकरण कक्षाचे कामकाजही कोलमडणार आहे.
नोंदणी सीपीआरमध्ये... उपचार सेवा रुग्णालयात
सीपीआरमध्ये येणाऱ्या रुग्णांची नोंद सुरुवातीला घेतली जाते. मात्र, नोंद झाल्यानंतर त्यांना येथील बाह्यरुग्ण विभाग बंद असल्याने सेवा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे नोंदणी सीपीआरमध्ये आणि उपचार मात्र सेवा रुग्णालयात अशी स्थिती पाहायला मिळत आहे.
फोटो: १२ सेवा रुग्णालय