मुख्यालय सोडल्यास डॉक्टरांवर कडक कारवाई, जिल्हा परिषद आरोग्य समितीचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 02:28 PM2020-07-08T14:28:10+5:302020-07-08T14:29:40+5:30
कोल्हापूर : कोरोनामुळे सध्या सर्व आरोग्य यंत्रणा व्यस्त असली तरी पावसाळ्यामुळे साथरोग आणि महापुराचा धोका समोर असल्याने त्याच्याकडे अजिबात ...
कोल्हापूर : कोरोनामुळे सध्या सर्व आरोग्य यंत्रणा व्यस्त असली तरी पावसाळ्यामुळे साथरोग आणि महापुराचा धोका समोर असल्याने त्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये, अशा सक्त सूचना मंगळवारी आरोग्य सभापती हंबीरराव पाटील यांनी दिल्या. पूर्ण पावसाळ्यात येणारा प्रत्येक दिवस धोक्याचा असल्याने कोणत्याही परिस्थितीत डॉक्टरांनी मुख्यालय सोडू नये; सोडल्यास कडक कारवाई करू, असा इशाराही त्यांनी दिला.
मंगळवारी जिल्हा परिषदेत सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत व्हीसीद्वारे आरोग्य समितीची बैठक झाली. सभापती हंबीरराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत मुख्यालयातून जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे, सदस्य सविता भाटले यांनी उपस्थिती लावली; तर ऑनलाईनद्वारे आरोग्य समितीचे इतर सदस्य सहभागी झाले.
बैठकीत कोरोनाचा ग्रामीण भागात वाढलेल्या शिरकावावर चिंता व्यक्त करताना योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. तपासण्या आणि चाचण्यांची संख्या वाढवावी, त्यात कोणत्याही प्रकारची हयगय करू नये असेही सांगण्यात आले. आता पावसाळा सुरू झाल्याने नुसते कोरोना कोरोना म्हणत बसून चालणार नाही.
साथरोगाचा प्रसार होण्याची शक्यता गृहीत धरून तशी यंत्रणा तैनात करा अशा सूचना आरोग्याधिकाऱ्यांना देण्यात आल्या. महापुरामुळे बाधित होणाऱ्या गावांतील आरोग्य परिस्थितीवर आतापासून लक्ष ठेवा, असे सांगून पूरबाधित जनतेसाठी अतिरिक्त औषधसाठाही करून ठेवण्यात आला आहे. गरजेनुसार त्याचा पुरवठा तातडीने करावा, असेही समितीने सांगितले. पावसाळ्यातील लसीकरणाचे काम तातडीने हाती घ्यावे, असे आदेशही आरोग्य यंत्रणेला देण्यात आले.