‘गोकुळ’मध्ये चुकीचे करणाऱ्यावर कठोर कारवाई - पालकमंत्री हसन मुश्रीफ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 03:59 PM2024-07-06T15:59:06+5:302024-07-06T15:59:20+5:30
निनावी पत्राची जोरदार चर्चा, लवकरच सत्तारुढ गटाच्या नेत्यांची बैठक
कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाचा कारभार दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने आमच्यावर सोपवला आहे. संघात काही चुकीच्या गोष्टी झाल्या असतील तर कोणालाही माफ करणार नाही. संबधितांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
‘गोकुळ’ दूध संघात गेल्या दोन महिन्यापासून पशुखाद्य वाहतुकीतील घोटाळा, दूध चोरी तर पशुसंवर्धन विभागातील औषध विभागाबाबतच्या निनावी पत्राची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचे पडसाद संचालक मंडळाच्या बैठकीतही उमटले असून संबधित वाहतूक संस्थेकडून पैसेही भरून घेतले असले तरी त्याची व्याप्ती मोठी आहे. याबाबत, मंत्री हसन मुश्रीफ यांना विचारले असता, जिल्ह्यातील सामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून सूत्रे दिली. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. संघातील काही गोष्टी आमच्या कानापर्यंत आल्या असून याबाबत लवकरच सत्तारुढ गटाच्या नेत्यांची बैठक घेऊ. गेल्या तीन वर्षात ‘गोकुळ’ चांगले काम केले आहे. गाय व म्हैस दूध उत्पादनात उच्चांक गाठला असून दूध दरही सर्वाधिक दिला आहे. काही गोष्टी घडल्या असतील तर संबधितांवर कठोर कारवाई केली जाईल.
म्हणून विरोधकांच्या पोटात गोळा
कोणतेही सरकार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून योजना जाहीर करत नसते. जनतेच्या भल्यासाठी आम्ही योजना सुरू केली असून विरोधकांच्या पोटात गोळा आल्याची टीका मंत्री मुश्रीफ यांनी केली.