ससूनप्रश्नी दोषींना अद्दल घडवू, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 11:33 AM2024-05-31T11:33:31+5:302024-05-31T11:35:39+5:30
''व्यवस्थेमध्ये पारदर्शीपणा आणावा लागेल, असे ऑपरेशन नक्कीच करू''
कोल्हापूर : पुण्यातील ससून हॉस्पिटलसारख्या घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून व्यवस्था खालून वरपर्यंत दुरुस्त करावी लागेल. व्यवस्थेमध्ये पारदर्शीपणा आणावा लागेल, असे ऑपरेशन नक्कीच करू, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी दिले.
पत्रकारांशी संवाद साधताना मुश्रीफ म्हणाले, ससून हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. अजय तावरे हे सध्या त्या पदावर कार्यरत नव्हते. ससूनमधील रुग्णाचा उंदीर चावून मृत्यू झाल्यानंतर दहा एप्रिल २०२४ रोजीच त्यांना पदमुक्त केले होते. प्राध्यापक म्हणून ते काम करीत होते. रजेवर असतानाही त्यांनी तीन लाख रुपयांच्या हव्यासापोटी रक्त नमुने बदलले आहेत, हे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. आ. सुनील टिंगरे यांच्या पत्रातील विनंतीनुसार त्यांना पदोन्नती दिली होती, हे खरे आहे. न्यायालये अशा वैद्यकीय चाचण्यांच्या अहवालावर विश्वास ठेवून निकाल देत असतात. अशा घटना होऊ लागल्या तर चुकीचा संदेश जाईल.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे अशा गोष्टींना कधीच पाठीशी घालत नाहीत. अशा प्रकरणातील दोषींवर अतिशय कडकपणाने कारवाई करण्याबद्दल त्यांचे आदेश असतात. अंजली दमानिया यांचे आव्हानही त्यांनी स्वीकारले आहे. अजित पवार यांनी एवढी मोठी घटना असल्यामुळे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने पोलिस आयुक्तांना फोन केला होता. दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मंत्री म्हणजे ब्रम्हवाक्य नव्हे
तुमच्या पत्रावरच डॉ. अजय तावरे यांची पदोन्नती झाली आहे, या प्रश्नावर ते म्हणाले, मंत्री म्हणजे ब्रह्मदेव नव्हे. मंत्र्याचा आदेश म्हणजे ब्रह्मवाक्य नव्हे. संबंधित अधिकाऱ्यांनीही ते ठरवायचे आहे. चुकीचे असेल तर त्यांनी तसे स्पष्टपणे सांगितले पाहिजे.