पर्यटकांना उपाशी ठेवणारी ‘कडक’ आचारसंहिता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:26 AM2019-04-18T00:26:52+5:302019-04-18T00:26:58+5:30
समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : रात्री साडेदहानंतर सगळ्याच हॉटेल्समध्ये गोंधळ होणार हे गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने ...
समीर देशपांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : रात्री साडेदहानंतर सगळ्याच हॉटेल्समध्ये गोंधळ होणार हे गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या अतिरेकी आचारसंहितेमुळे हजारो प्रवाशांवर उपाशी राहण्याची वेळ येत आहे. कोल्हापुरात उशिरा येणाऱ्यांना अन्नासाठी अक्षरश: विनवणी करण्याची पाळी आली असून, केवळ कोल्हापूर, सांगलीतच ही बंधने का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, कोल्हापूरच्या तीन हॉटेलमालकांनी या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.
जमावबंदीचे १४४ कलम लावून कोल्हापूर आणि सांगली शहरांतील हॉटेल्स साडेदहानंतर बंद करावीत, असे तुघलकी फर्मान जिल्हा प्रशासनाने काढले आहे. या फर्मानाचा परिणाम काय होणार याचा विचार न करता याची तातडीने अंमलबजावणी सुरू झाल्याने हॉटेल व्यावसायिकांचे कंबरडेच मोडले आहे.
परंतु हा फटका केवळ हॉटेल व्यावसायिकांना बसला नाही; तर मुंबई, पुण्याहून येणाºया प्रवाशांनाही त्याचा रोज फटका बसत आहे. रात्री दहानंतर कोल्हापुरात आल्यानंतर या मंडळींना खायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्टॅँडजवळचे गाडे बंद केले जातात. हॉटेल्स साडेदहाला बंद केली जातात. त्यामुळे कांदेपोहे खाऊन तरी पोट भरावं म्हटलं तरी तेही मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. अक्षरश: छोटी मुलं बरोबर असणारे पालक हॉटेलवाल्यांना विनवणी करताना दिसत आहेत. आचारसंहिता लागू झाल्यानंतर जेव्हा हॉटेलचालकांनी या नियमाबाबत प्रशासनाकडे विचारणा केली तेव्हा मग साडेदहापूर्वी तुमच्या हॉटेलमध्ये जे ग्राहक येतील त्यांना सेवा देण्यास हरकत नाही; पण साडेदहाला शटर बंद करायचे असे सांगण्यात आले.
कंपाऊंडच्या आतील जबाबदारी हॉटेलमालकांची
हॉटेलसाठी परवाना देतानाच कंपाऊंडच्या आत जे काही होईल त्याची जबाबदारी हॉटेलमालकावर टाकण्यात आली आहे. असे असताना ही जबाबदारी मालक घेत असताना पुन्हा प्रशासनाने आचारसंहितेच्या नावाखाली नागरिकांना उपाशी ठेवणारा आदेश का काढला, अशी विचारणा केली जात आहे. तुम्ही बार एकवेळ बंद ठेवा; परंतु लोकांच्या पोटावर मारू नका, असे आवाहन प्रशासनाला हॉटेलमालकांकडून करण्यात येत आहे.
मोफत जेवणाची सोय
जर प्रशासन या पद्धतीनेच मनमानी करीत असेल तर किमान रात्री एस. टी. स्टॅँडवर येणाºया प्रवाशांच्या जेवणाची तरी मोफत सोय प्रशासनाने करावी, अशीही मागणी या निमित्ताने केली जात आहे.
तीन हॉटेल्समालक न्यायालयात
कोल्हापुरातील सचिन शानबाग, सिद्धार्थ लाटकर, आशिष रायबागे हे तिघे हॉटेलमालक या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात गेले आहेत.