कोरोना चेन ब्रेक करण्यासाठीच कडक लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:23 AM2021-05-15T04:23:22+5:302021-05-15T04:23:22+5:30
कोल्हापूर : प्रशासन म्हणून काळजी घेणे आमची नैतिक जबाबदारीच आहे; पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता पाहता प्रशासनाने कितीही सुविधा ...
कोल्हापूर : प्रशासन म्हणून काळजी घेणे आमची नैतिक जबाबदारीच आहे; पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता पाहता प्रशासनाने कितीही सुविधा पुरवल्या तरी त्या कमीच पडणार आहेत. त्यामुळे कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठीच कडक लॉकडाऊन केले असून प्रशासनाला साथ द्यावी, अशी हाक पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूरकरांना दिली आहे. चांगल्या कामासाठी कोल्हापूरकर कायमच पुढे येतात, येथेही थोडा संयम राखून, कळ सोसून सहकार्य करतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
आज शनिवारी रात्रीपासून आठ दिवस लागू होणाऱ्या कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पाटील यांनी फेसबुक लाइव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. कोविडची परिस्थिती, लसीकरण, प्रशासनाने राबवलेल्या उपाययोजना याबाबतीत माहिती दिली. जिल्ह्यात जानेवारीच्या तुलनेत एप्रिलमध्ये कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण १० पटीने वाढले. त्यामुळे जिल्ह्यात संसर्गाचा दर ३० टक्क्यांच्या वर गेल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. अशा परिस्थितीत या कोरोनाला थांबवण्यासाठी ‘ब्रेक द चेन’शिवाय पर्याय नाही. नागरिकांनी प्रशासनाच्या या प्रयत्नांना साथ द्यावी, असे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी केले.
चौकट
मृत्यूदर चिंताजनक
देशातील सर्वाधिक मृत्यूदर असल्याबद्दल सांगताना मंत्री पाटील यांनी तो कमी करण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत; पण एकूण मृत्यू झालेल्या २०७२ पैकी १५ टक्के मृत्यू हे परजिल्हा व राज्यातील आहेत. कोल्हापुरात मृत्यू होणाऱ्यांमध्ये २४ तासांत मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण २२ टक्के, ४८ तासांच्या आत मृत्यू होण्याचे प्रमाण १२ टक्के आहे. एकत्रित आढावा घेतला तर ३४ टक्के मृत्यू हे ४८ तासांच्या आत उपचार न मिळाल्याने झाले असल्याने नागरिकांनी उपचारासाठी वेळ दवडू नये. लवकर निदान, लवकर उपचार केले तर मृत्यू रोखता येऊ शकतात.
चौकट
नोंदणी केेलेल्यांनाच लस
जिल्ह्यात पुणे- मुंबईच्या बराेबरीने राज्यात सर्वाधिक ६२ टक्के इतके लसीकरण पूर्ण झाले आहे. लसींची उपलब्धता नसल्याने फक्त दुसरा डोस व ज्येष्ठांना प्राधान्य दिले आहे. नोंदणी केलेल्यांनाच ते दिले जात असल्याने लसीकरण केंद्रावर मेसेज आल्याशिवाय अनावश्यक गर्दी करू नका.
चौकट
जिल्ह्याला लागणारा ऑक्सिजन : ५० ते ६४ टन
जिल्ह्यातून परजिल्ह्यात जाणारा ऑक्सिजन : ७.५ टन
गोव्याला कोल्हापुरातून जणारा ऑक्सिजन : १० टन
चौकट
आरोग्य यंत्रणा सज्ज
जिल्ह्यातील १४ ऑक्सिजन प्लांटमधून किमान २३ टन ऑक्सिजन मिळणार आहे. ऑक्सिजन बेडची संख्या ३०० वरून ३ हजार केली आहे. व्हेंटिलेटर्सची संख्या १०० वरून ४०० पर्यंत वाढवण्यात आली आहे. ५०० ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर येत्या १५ दिवसांत मिळणार आहेत. रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठाही १५०० पर्यंत वाढवण्यात आला आहे.