निपाणी तालुक्यात आजपासून कडक लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:24 AM2021-05-21T04:24:40+5:302021-05-21T04:24:40+5:30
निपाणी : निपाणी तालुक्यात आज शुक्रवार, दि २१ ते २८ मे अखेरपर्यंत २७ ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या सर्व गावांमध्ये कडक ...
निपाणी : निपाणी तालुक्यात आज शुक्रवार, दि २१ ते २८ मे अखेरपर्यंत २७ ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या सर्व गावांमध्ये कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार असल्याची माहिती तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी दिली आहे.
तहसीलदारांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रात म्हटले आहे की, निपाणी तालुक्याचा बहुतांशी भाग हा महाराष्ट्राला जोडलेला आहे. सध्या तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. निपाणी शहर वगळता ग्रामीण भागात राज्य सरकारने जारी केलेल्या नियमांचे पालन होत नसल्याची बाब निदर्शनास आल्याने प्रशासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.
निपाणी तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांत २०० हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर सुमारे ५० हून अधिक रुग्णांचा बळी गेला आहे. असे असताना ग्रामीण भागातील नागरिक, व्यावसायिक गांभीर्य पाळत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाच्या वाढीला वाव मिळत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.