कडक लॉकडाऊन हाच पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:25 AM2021-05-11T04:25:14+5:302021-05-11T04:25:14+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोनाची गंभीर स्थिती पाहता आता केवळ कडक लॉकडाऊन हाच ...
कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोनाची गंभीर स्थिती पाहता आता केवळ कडक लॉकडाऊन हाच पर्याय शिल्लक राहिला आहे. त्यामुळे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी याचे संकेत दिले आहेत. मात्र, त्यामध्येही पळवाटा काढून अंशत सूट दिली तर मात्र या लॉकडाऊनचा काही उपयोग होणार नसल्याचे मत व्यक्त होत आहे.
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी ६ एप्रिलला जिल्हा बंदीसह तालुका बंदीचाही आदेश काढला होता. त्यावेळी परिस्थिती खूपच नियंत्रणात होती. ५ एप्रिल ते ११ एप्रिल या आठवड्यामध्ये केवळ १५३७ रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. देसाई यांनी काढलेला हा आदेश प्रभावीपणे पाळला गेला असता तर कदाचित ही रुग्णसंख्या इतक्या प्रमाणात वाढली नसती असे आरोग्य क्षेत्रातील अनेकांचे मत आहे. परंतु, याविषयी कोणी उघडपणे बोलत नाही. मात्र, देसाई यांचा हा आदेश २४ तासांत मागे घेण्यात आला. त्यानंतर ‘गोकुळ’ची निवडणूकही पार पडली.
त्यानंतरच्या १९ एप्रिल ते २५ एप्रिल या आठवड्यामध्ये ५७५४ पॉझिटिव्ह रुग्ण आले. २६ एप्रिल ते २ मे या आठवड्यामध्ये हेच प्रमाण वेगाने वाढले आणि ते ६ हजार ८४० इतके झाले, तर ३ मे ते ९ मे या आठवड्यात तब्बल ८ हजार ०८३ इतके रुग्ण पॉझिटिव्ह आले. हे प्रमाण चाचण्यांच्या तब्ब्बल २८.३३ टक्क्यांपर्यंत गेले.
‘गोकुळ’ची निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. परंतु, त्यावर समाजमाध्यमातून जोरदार टीका झाल्याने चार तासांतच हा निर्णय मागे घेण्यात आला. मात्र, रुग्णसंख्या आणि मृत्युसंख्या कमीच येत नसल्याने अखेर लॉकडाऊनच हा पर्याय स्वीकारावा लागणार आहे. जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनपासून ऑक्सिजनपर्यंतचा तुटवडा आहे. व्हेंटिलेटरचे बेड मिळत नाहीत. ऑक्सिजनच्या बेडसाठीही अनेक ठिकाणी चौकशी करावी लागते. कोल्हापुरात सहज जरी अँटिजन चाचणी केली तरी रस्त्यावरील दहा, बाराजण पॉझिटिव्ह येऊ लागले आहेत. त्यामुळेच आता हा निर्णय घ्यावा लागणार आहे.
चौकट
नागरिकांच्या प्रतिसादाची गरज
ऐन कोरोना काळात ‘गोकुळ’ची निवडणूक घेण्याची गरज होती काय असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जातो. परंतु, एकदा का न्यायालयात प्रश्न गेल्यानंतर त्या निर्णयानुसार निवडणूक घेतली गेली. हा निर्णय बरोबर, चूक यापेक्षा आता येणाऱ्या या परिस्थितीला नागरिकांनीही प्रतिसाद देण्याची गरज आहे. सकाळी ७ ते ११ या कालावधीतील गर्दी पाहता नागरिकांनी आपल्यासह आपल्या घरादाराची काळजी घेण्यासाठी कडक लॉकडाऊनला प्रतिसाद देण्याची गरज आहे.