कोल्हापूर-सांगलीत पुन्हा कडक लॉकडाऊन शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 07:14 AM2020-08-31T07:14:22+5:302020-08-31T07:24:31+5:30
कोल्हापूर-सांगलीत पुन्हा कडक लॉकडाऊन करण्याची तयारी सुरू झाली आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णाची आणि त्यास बळी पडलेल्याची संख्या प्रचंड वाढू लागल्याने या दोन जिल्ह्यातील लॉकडाऊन पुन्हा कडक करण्याचा विचार राज्य सरकारच्या पातळीवर सुरू आहे.त्यास अधिकृत सूत्रांनी दुजोरा दिला.
आज केंद्र शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनची मुदत संपत आहे. त्यामुळे एक-दोन दिवसांत याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात रविवारी १२६० नवे रुग्ण सापडले असून ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. ही स्थिती स्फोटक बनली आहे. रुग्ण संख्या प्रचंड वाढू लागल्याने आरोग्य आणि प्रशासकीय यंत्रणा अपुरी पडत आहे. रुग्णांना बेड मिळत नाही, वेळेवर उपचार होत नाहीत त्यामुळे मृत्यू होऊ लागले आहेत.
खासगी दवाखान्यात उपचारासाठी बेड उपलब्ध होणे यासाठीच रुग्णांच्या नातेवाईकांना दारोदार फिरण्याची वेळ आली आहे.
त्यामुळे किमान १० दिवसाचा लॉकडाऊन परत कडक करून संसर्गाची साखळी कशी तोडता येईल असा विचार मुख्यतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पातळीवर सुरू झाला आहे.
या दोन जिल्ह्यातील गंभीर स्थिती मुख्यमंत्र्यांच्या कानांवर घालून पुरेशी साधने उपलब्ध करून द्यावीत अशी विनंती करण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला होता.त्यांच्याकडून लॉकडाऊन कडक करण्याबाबत सूतोवाच करण्यात आले. शेट्टी यांनीही त्यास दुजोरा दिला आहे.
एका बाजूला केंद्र सरकारकडून सगळेच निर्बंध उद्या मंगळवारपासून (दि १ सप्टेंबर) उठवण्यात येत आहेत. ई पासही रद्द करा असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे आणि राज्य शासन लॉकडाऊन कडक करणार असेल तर त्याबद्धल लोकांतून प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून लॉकडाऊन कडक करण्याबाबतचे संकेत मिळाले आहेत. आज सोमवारी याबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदामंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून काय तो निर्णय आम्ही घेऊ
सतेजपाटील
पालकमंत्री कोल्हापूर
असाहीएकमतप्रवाह
सध्या जे निर्बन्ध आहेत ते तसेच चालू ठेवून सायंकाळी ७ वाजल्यांतरचे व्यवहार शंभर टक्के बंद केले जावेत..म्हणजे सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन करावा असाही एक मतप्रवाह आहे.
माजी खासदार शेट्टी यांनीही लॉकडाऊन कडक करण्यापेक्षा उपचाराच्या सुविधा जास्तीतजास्त कशा निर्माण करता येतील त्यावर भर द्यावा असे वाटते..लॉकडाऊन मुळे हातावरील पोट असलेल्या मोठया वर्गाची उपासमार होते ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही..