करवीरच्या पश्चिम भागातही कडक लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:24 AM2021-05-16T04:24:04+5:302021-05-16T04:24:04+5:30
म्हालसवडे : कोरोनाच्या साथीला आळा घालण्याकरिता जिल्हा प्रशासनाने घातलेल्या निर्बंधांची ग्रामपंचायत प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. संशयित ...
म्हालसवडे : कोरोनाच्या साथीला आळा घालण्याकरिता जिल्हा प्रशासनाने घातलेल्या निर्बंधांची ग्रामपंचायत प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. संशयित रुग्णांच्या तत्काळ तपासण्या करण्यात येणार असून, लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.
कसबा आरळे (ता. करवीर) येथील ग्रामपंचायतीमध्ये सरपंच ईश्वरा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये पालक अधिकारी एच. एस. हावळे यांनी सूचना दिल्या. याचप्रमाणे सावर्डे दुमाला, मांडरे, चाफोडी व घानवडे येथील ग्रुप ग्रामपंचायतीमध्येही बैठका घेण्यात आल्या.
अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यापार, व्यवसाय बंद करणे, दूध संकलनावेळी शासकीय नियमांचे काटेकोर पालन करणे, एमआयडीसीमध्ये कामाला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या तपासण्या करणे, सरपंचांच्या अध्यक्षतेखाली प्रभागनिहाय कमिटी स्थापन करणे, कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल करणे, ४५ वयोगटावरील नागरिकांच्या लसीकरणाचे शिस्तबद्ध नियोजन करणे, अशा व्यापक सूचना ग्रामपंचायतींना पालक अधिकाऱ्यांनी दिल्या. यावेळी मंडल अधिकारी मदन सूर्यवंशी, कृषी साहाय्यक संजय पवार, तलाठी प्रकाश मिठारी, युवराज भोगम, चंदर नाईक उपस्थित होते.