‘थर्टी फर्स्ट’ला कोल्हापूर, इचलकरंजीत नाकाबंदी; ओपन बारवर पोलिसांची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2021 12:20 PM2021-12-30T12:20:11+5:302021-12-30T12:30:27+5:30
उद्या, शुक्रवारी रात्री साजऱ्या होणाऱ्या ‘थर्टी फर्स्ट’साठी कोल्हापूर जिल्ह्यात पोलिसांचा कडक बंदोबस्त राहणार आहे.
कोल्हापूर : उद्या, शुक्रवारी रात्री साजऱ्या होणाऱ्या ‘थर्टी फर्स्ट’साठी कोल्हापूर जिल्ह्यात पोलिसांचा कडक बंदोबस्त राहणार आहे. कोल्हापूरसह इचलकरंजी शहरात नाकाबंदी करण्यात येणार आहे. ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह आणि ओपन बारवर कारवाईसाठी मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार आहे.
नागरिकांना सरत्या वर्षाला निरोप देताना व नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करताना कोरोना निर्बंधातच राहावे लागणार आहे. दरम्यान, नागरिकांनी ‘थर्टी फर्स्ट’चा जल्लोष करताना जमावबंदी आदेशाचे पालन करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे.
३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गेल्या पंधरा दिवसांपासूनच ओपन बारवर कारवाईचे शस्त्र उगारले आहे. पोलिसांकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. शहरात प्रवेश करणाऱ्या तसेच राज्यातून प्रवेश होणाऱ्या मार्गावर रात्रीच्यावेळी नाकाबंदी राहणार आहे. या कालावधीत प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जाणार आहे.
मद्य प्राशन करून वाहन चालवणाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. हुल्लडबाजांवर लक्ष ठेवण्यासाठी चौका-चौकात पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. जमावबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे.