coronavirus : कोल्हापुरात कडक निर्बंध, जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांना 'ही' कागदपत्रे बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2021 02:05 PM2021-11-30T14:05:49+5:302021-11-30T18:30:34+5:30
जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट तसेच कोरोनाचे दोन डोस घेतलेले प्रमाणपत्र बंधनकारक राहणार आहे.
कोल्हापूर : कोरोनाच्या 'ओमायक्रॉन' या नव्या व्हेरिएंटचे रूग्ण सापडू लागल्याने सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. कर्नाटक राज्य शासनाने खबरदारी म्हणून सीमा तपासणी पथके सज्ज केली आहेत. यानंतर आता कोल्हापूरचे प्रशासनही सतर्क झाले आहे. जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट तसेच कोरोनाचे दोन डोस घेतलेले प्रमाणपत्र बंधनकारक राहणार आहे.
कोविड- 19 प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलबजावणी आदेश बाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
सद्यस्थितीत कोल्हापुरातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली आहे. काल दिवसभरात जिल्ह्यात एकही रुग्ण आढळला नाही. तर उपचारातील रुग्ण संख्या देखील ५० च्या खाली येवून पोहचली आहे. यामुळे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाने डोकेवर काढू नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. आज पासून महापालिकेने विना मास्क फिरणाऱ्या विरोधात कारवाईची मोहिम देखील सुरु केली आहे.
कोल्हापुरात कडक निर्बंध करण्याआधीच कर्नाटक प्रशासनाने सीमेवर टोलनाक्यावर तपासणी नाके उभा केले आहेत. तपासणीनंतर प्रवाशांना कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. यात सीमाभागातील नागरिक तसेच कर्नाटक राज्याबाहेर पुढील राज्यांना जाणाऱ्या प्रवाशांना सवलत देण्यात आली आहे.
आजरा, गडहिंग्लज, चंदगडकराना सवलत
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, गडहिंग्लज व चंदगड या तालुक्यांना जाण्यासाठी कर्नाटकातील राष्ट्रीय महामार्गावरूनच प्रवास करावा लागतो. आरटीपीसीआर सक्तीमुळे या तालुक्यातील प्रवाशांच्या जिल्ह्यांतर्गत प्रवासावरच निर्बंध आले होते. परंतु या प्रवाशांच्या रहिवासी पुराव्यांची खातरजमा करून त्यांच्या प्रवासास सवलत देण्यात आल्याने त्यांची गैरसोय टळली आहे.
कोल्हापूर प्रवेशासाठी हे आहेत नियम...
- व्यक्तीचे संपूर्ण लसीकरण म्हणजेे लसीचा दुसरा डोस होऊन १४ दिवस झाले असतील तर
- १० वर्षाखालील व्यक्तींचा वयाचा पुरावा
- वैद्यकीय कारणास्तव लस घेतली नसेल तर नोंदणीकृत डॉक्टरचे प्रमाणपत्र
- वरील कागदपत्रे नसतील तर ७२ तासांच्या आतील निगेटिव्ह रिपोर्ट
रुमाल, एकपदरी मास्क असेल तर दंड
हा व्हायरस अधिक प्रभावी असल्याने प्रत्येकाकडे एन ९५ मास्क, तीनपदरी मास्क किंवा सर्जिकल तीनपदरी मास्क असेल तरच मास्क घातला असे समजले जाईल. रुमाल किंवा एकपदरी मास्क असेल तर मास्क घातलेला नाही असे समजून ५०० रुपयांचा दंड केला जाईल.