हॉट स्पॉट गावांत नियमांची कडक अंमलबजावणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 10:38 AM2021-07-10T10:38:47+5:302021-07-10T10:41:02+5:30
CoronaVIrus In Kolhpaur : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा रुग्णदर अपेक्षेप्रमाणे कमी होत नसल्याचे दिसत आहे, याची शास्त्रोक्त कारणे शोधून त्यातील त्रुटी दूर करा, हॉट स्पॉट गावांत नियमांची कडक अंमलबजावणी करा, गृह विलगीकरण कमी करा व रुग्णदर नियंत्रणात आणण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिल्या.
कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा रुग्णदर अपेक्षेप्रमाणे कमी होत नसल्याचे दिसत आहे, याची शास्त्रोक्त कारणे शोधून त्यातील त्रुटी दूर करा, हॉट स्पॉट गावांत नियमांची कडक अंमलबजावणी करा, गृह विलगीकरण कमी करा व रुग्णदर नियंत्रणात आणण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण दर, मृत्यू दर, वैद्यकीय उपचार सेवा-सुविधा यांचा सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले, ग्रामीण भागामध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असून याची कारणे शोधून त्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत. रुग्णसंख्या अधिक असणाऱ्या गावांमधील संसर्ग नियंत्रणासाठी यंत्रणेने अधिक प्रयत्न करावेत.
हॉट स्पॉट गावांमध्ये नियमांची कडक अंमलबजावणी करा. गृह विलगीकरण प्रभावीपणे होतेय का, यावर लक्ष ठेवा. गृह विलगीकरणातील रुग्ण, बाधित तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या, उपलब्ध खाटा ही माहिती ऑनलाईन पद्धतीने अद्ययावत करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. प्रभारी जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.