वाळू वाहतूकदारांकडून ‘सर्कल’ला मारहाण
By admin | Published: December 17, 2015 12:23 AM2015-12-17T00:23:26+5:302015-12-17T01:11:57+5:30
जत येथील घटना : जीवे मारण्याची धमकी
जत : विनापरवाना वाळू वाहतूक करणारा ट्रक अडवून परवान्याची चौकशी केल्याबद्दल कुंभारी (ता. जत) येथील मंडल अधिकारी प्रशांत राजाराम बुचडे यांना दोघा वाहतूकदारांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना बुधवारी सकाळी सहाच्यादरम्यान जतच्या जयहिंद चौकात घडली. याप्रकरणी बुचडे यांनी ट्रकचालक सोमनाथ गुरलिंग सिरसाड (वय ३५) व ट्रकमालक चंद्रकांत शंकरेप्पा गुड्डोडगी (४०, रा. दोघे जत) त्यांच्याविरोधात जत पोलिसांत फिर्याद दिली आहे. याबाबत जत पोलिसांकडून मिळालेली अधिक महिती अशी, बुधवारी सकाळी सोमनाथ सिरसाड ट्रकमधून (क्रमांक एमएच १० झेड ४०६८) वाळू घेऊन जत शहरात येत होता. त्यावेळी मंडल अधिकारी प्रशांत बुचडे व माडग्याळ (ता. जत) येथील मंडल अधिकारी नंदकुमार बुकटे यांनी ट्रक अडवून सिरसाडकडे परवान्याची मागणी केली. तोपर्यंत ट्रकमालक चंद्रकांत गुड्डोडगी तेथे आला. ‘तुम्ही केवळ आमच्या गाड्या अडवता आणि इतरांच्या गाड्या सोडता’, असे म्हणून दोघांनी बुचडे यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी दोघांनी बुचडे यांना जिवे मारण्याची धमकीही दिली. माडग्याळचे मंडल अधिकारी बुकटे यांनी दोघांना रोखल्याने बुचडे बचावले. बुकटे यांनीच या घटनेची माहिती तहसीलदार अभिजित पाटील यांना देऊन पथक बोलावून घेतले. दरम्यान, सिरसाड व गुड्डोडगी तेथून पसार झाले. त्यानंतर मारहाण आणि जिवे मारण्याची धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणल्याची फिर्याद बुचडे यांनी पोलिसांत दिली. (वार्ताहर)
महसूलचे काम बंद आंदोलन
दरम्यान, प्रशांत बुचडे यांना झालेल्या मारहाणीचा निषेध करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी जत तालुका मंडल अधिकारी व महसूल कर्मचारी संघटनेने बुधवारी सकाळपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे जत तहसील कार्यालयातील कामकाज ठप्प झाले आहे.