काळम्मावाडी धरणग्रस्तांचा धडक मोर्चा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 11:44 AM2019-01-22T11:44:14+5:302019-01-22T11:47:27+5:30
धरणग्रस्तांना २००१ पासून आतापर्यंत मिळालेल्या जमिनी अतिरिक्त ठरवून त्या परत घेण्याबाबत प्रशासनाने नोटिसा पाठविल्या आहेत. त्या परत घ्याव्यात, या मागणीसाठी काळम्मावाडी धरणग्रस्त संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. धरणग्रस्तांचे म्हणणे ऐकून न घेता जमिनी काढून घेतल्यास आत्मदहन करू, असा इशाराही अध्यक्ष बाबूराव पाटील यांनी दिला.
कोेल्हापूर : धरणग्रस्तांना २००१ पासून आतापर्यंत मिळालेल्या जमिनी अतिरिक्त ठरवून त्या परत घेण्याबाबत प्रशासनाने नोटिसा पाठविल्या आहेत. त्या परत घ्याव्यात, या मागणीसाठी काळम्मावाडी धरणग्रस्त संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. धरणग्रस्तांचे म्हणणे ऐकून न घेता जमिनी काढून घेतल्यास आत्मदहन करू, असा इशाराही अध्यक्ष बाबूराव पाटील यांनी दिला.
दुपारी एकच्या सुमारास टाऊन हॉल उद्यान येथून धरणग्रस्तांच्या मोर्चाला सुरुवात झाली. घोषणाबाजी करीत हा मोर्चा सीपीआर चौक, खानविलकर पेट्रोलपंप मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. या ठिकाणी निदर्शने करून ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडण्यात आला. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. यानंतर बाबूराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, आपले संसार फोंड्या माळावर मांडून दुसऱ्याचे संसार फुलविण्यासाठी त्याग केलेल्या धरणग्रस्तांची कुचेष्टा सुरू आहे. २००१ पासून आतापर्यंतच्या धरणग्रस्तांच्या जमिनी अतिरिक्त ठरवून त्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. या नोटिसांवर वेळोवेळी धरणग्रस्तांनी आवाज उठविला असता वेगवेगळे निकष काढण्यात आले. त्यामुळे संघटनेतर्फे मुंबई उच्च न्यायालयात संकलन दुरुस्तीसाठी जनहित याचिका दाखल केली.
यामध्ये पुणे विभागीय आयुक्तांना संकलन दुरुस्तीचे आदेश देण्यात आले. त्यानुसार आयुक्तांनी जिल्हाधिकारी व धरणग्रस्तांची बैठक घेऊन बुडीत असलेले पुरावे व नियत दिनांकावेळी कुटुंबातील लोकसंख्येचे पुरावे घेऊन संकलन दुरुस्तीचे आदेश दिले. त्याचप्रमाणे संकलन दुरुस्ती झाली. त्याचबरोबर ३० टक्के दुरुस्तीचे काम अपूर्ण असताना प्रशासन धरणग्रस्तांचे म्हणणे ऐकून न घेता जमिनी कमी करण्याच्या नोटिसा पाठविल्या आहेत. हे चुकीचे असून त्या तत्काळ मागे घ्याव्यात.
आंदोलनात विठ्ठल चव्हाण, बाबूराव कांबळे, नाथा पाटील, विजय पाटील, श्रावण पाटील, मारुती पाटील, सुनील धोंड, ऐश्वर्या निरुखेकर, वंदना पाटील, छाया पाटील, आदींसह सहभागी झाल्या होत्या.