Strike of government employees: कोल्हापुरात कचरा उठाव ठप्प, महापालिकेत शुकशुकाट
By भारत चव्हाण | Published: March 14, 2023 04:58 PM2023-03-14T16:58:02+5:302023-03-14T16:58:37+5:30
जे कर्मचारी २००५ नंतर भरती झाले आहेत, आणि ज्यांना जुनी पेन्शन लागू नाही असे सर्व कर्मचारी, अधिकारीही संपात सहभागी
कोल्हापूर : जुनी पेन्शन सुरु करावी या मागणीसाठी राज्यभरात सुरु झालेल्या सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या संपात कोल्हापूर महानगरपालिकेचे सुमारे साडेतीन हजार कर्मचारी सहभागी झाल्यामुळे मंगळवारी शहरात कचरा उठावाचे काम ठप्प झाले, तर पालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयासह मुख्य प्रशासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांअभावी शुकशुकाट पसरला होता. प्रशासनाने, विभाग प्रमुखांना सोबत घेऊन कामकाज करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात अडचणी अनेक आल्याने कामकाजावर परिणाम जाणवला.
राज्यभरातील सर्व कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत, या संपात कोल्हापूर महापालिकेचेही कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. सोमवारी रात्री प्रशासनातर्फे उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी एक परिपत्रक काढून कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होऊ नये, विभाग प्रमुखांनी कार्यालयात उपस्थित राहून कामकाज सुरु करण्याचे आवाहन केले होते. तसेच कार्यालय उघडणे व बंद करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. परंतु या परिपत्रकाकडे कोणीही गांभीर्याने लक्ष दिले नाही.
पालिकेचे सर्व कर्मचारी सकाळी साडेनऊ वाजता मुख्य प्रशासकीय कार्यालयासमोर जमले. त्याठिकाणी कर्मचारी संघाचे पदाधिकारी विजय वणकुद्रे, दिनकर आवळे, अजित तिवले, काका चरापले यांनी संपाची माहिती दिली. थोडा वेळ घाेषणा दिल्या. त्यानंतर सर्व कर्मचारी मोर्चाने टाऊन हॉल उद्यानाकडे गेले. तेथून ते मुख्य मोर्चात सहभागी झाले. जे कर्मचारी २००५ नंतर भरती झाले आहेत, आणि ज्यांना जुनी पेन्शन लागू नाही असे सर्व कर्मचारी, अधिकारीही संपात सहभागी झाले आहेत. ज्यांना जुनी पेन्शन लागू आहे असेही कर्मचारी संपात सहभागी झाले.