संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी बाजार समितीकडून नियमांना हरताळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:22 AM2021-04-16T04:22:39+5:302021-04-16T04:22:39+5:30
कोल्हापूर: ब्रेक दि चेन अंतर्गत महिना अखेरपर्यंत लागू झालेल्या कडक संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी म्हणजे गुरुवारी बाजार समितीने सर्व नियमांना ...
कोल्हापूर: ब्रेक दि चेन अंतर्गत महिना अखेरपर्यंत लागू झालेल्या कडक संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी म्हणजे गुरुवारी बाजार समितीने सर्व नियमांना हरताळ फासला. व्यापारी, अडते, घाऊक ग्राहक यांनी सौद्याच्या वेळी एकच गर्दी केली. बाजार समिती प्रशासनही हातावर हात ठेवून नुसते बघत राहिले.
सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचा फज्जा उडाल्याचे चित्र गुरुवारी सकाळी बाजार समितीत दिसत होते. लॉकडाऊनच्या धास्तीने शेतकऱ्यांकडून आवक ही कमीच झाली आहे. आवक कमी झाली म्हणून दरही वाढलेले नाहीत. दोन दिवसांच्या तुलनेत आवकेत २५ टक्के तर घाऊक दरात १० किलोमागे १०० ते २०० रुपयांची घट झाली आहे. शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. बाजारच भरत नसल्याने मागणीही कमी झाली आहे. हॉटेलकडून होणारी मागणीही घटली आहे. या सर्वांचा परिणाम बाजार समितीतील मालाच्या उठावावर झाला आहे.
बाजार समितीने कोरोना प्रतिबंध उपाययोजना करणे अपेक्षित होते, पण सौद्याच्या वेळची गर्दी पाहिल्यावर यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे स्पष्ट झाले. व्यापारी, अडते यांच्याकडून देखील फारशी खबरदारी घेतल्याचे समिती आवारात दिसत नाही. शुक्रवारी भाजीपाला सौदे बंद असतात, त्यामुळे गुरुवारच्या सौद्याला गर्दी झाली.