महिला पोलिस अधिकाऱ्याची छेडछाड
By Admin | Published: April 3, 2016 03:50 AM2016-04-03T03:50:38+5:302016-04-03T03:50:38+5:30
तिघांना दंड : आरोपी गोकुळ शिरगाव येथील
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ, एनसीसी भवन परिसरातील फूटपाथवर शुक्रवारी
(दि. १) रात्री फिरायला गेलेल्या प्रशिक्षणार्थी महिला पोलिस अधिकाऱ्याची छेड काढल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी तिघा तरुणांना पोलिसी खाक्या दाखवीत ताब्यात घेतले. संशयित आरोपी सुधाकर सदाशिव पाटील, शुभम राजू पोवार, आकाश सदाशिव सुतार (तिघेही, रा. गोकुळ शिरगाव, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने प्रत्येकी दोनशे रुपये दंड केला.
याबाबत पोलिसांनी सांगितले, शिवाजी विद्यापीठ ते एनसीसी भवन या रस्त्याशेजारील फूटपाथवर शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास प्रशिक्षणार्थी महिला पोलिस अधिकारी आपल्या काही नातेवाईक महिलांसोबत फिरत होत्या. या दरम्यान सुधाकर पाटील, शुभम पोवार व आकाश सुतार या ठिकाणी आले. ते त्यांच्या पाठीमागून जाऊ लागले.
यावेळी त्यांनी महिला पोलिस अधिकाऱ्याकडे पाहून असभ्य वर्तन करीत छेड काढण्याचा प्रयत्न केला. संबंधित महिला अधिकाऱ्याने राजारामपुरी पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांनी या तिघांना पोलिस ठाण्यात आणून पोलिसी खाक्या दाखविला. पोलिसांनी तिघांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता प्रत्येकी दोनशे रुपये दंड ठोठावण्यात आला. (प्रतिनिधी)