‘मॉडेल स्टेशन’साठी प्रयत्नशील : धनंजय महाडिक

By admin | Published: April 21, 2016 12:56 AM2016-04-21T00:56:38+5:302016-04-21T00:56:38+5:30

केक कापून आनंदोत्सव : कोल्हापूर रेल्वेचा १२५ वा वाढदिवस साजरा

Striving for 'Model Station': Dhananjay Mahadik | ‘मॉडेल स्टेशन’साठी प्रयत्नशील : धनंजय महाडिक

‘मॉडेल स्टेशन’साठी प्रयत्नशील : धनंजय महाडिक

Next

कोल्हापूर : रंगीबेरंगी रांगोळी, तुतारीचा निनाद, ‘हॅपी बर्थडे टू यू’ आणि टाळ्यांचा गजर, अशा उत्साही वातावरणात बुधवारी कोल्हापूर रेल्वे सेवा आणि स्थानकाचा १२५ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते केक कापून आनंदोत्सव करण्यात आला. महाराष्ट्र रेल्वे व रोड पॅसेंजर्स असोसिएशनतर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला.
उद्योग-व्यवसाय, पर्यटन, आदी क्षेत्रांतील जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावणारी कोल्हापूरची रेल्वे सेवा आणि श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस या स्थानकाने शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष बुधवारी पूर्ण केले. यानिमित्त रेल्वे व रोड पॅसेंजर्स असोसिएशनतर्फे आयोजित कार्यक्रमासाठी खासदार धनंजय महाडिक प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्थानकातील छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यांना अभिवादन केल्यानंतर खासदार महाडिक यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा केला.
यावेळी उपस्थित कोल्हापूरकर, प्रवाशांनी ‘हॅपी बर्थडे टू यू’ चा गजर केला. त्यात तुतारी वादनाने रंग भरला. यावेळी खासदार महाडिक म्हणाले, संसदेत गेल्या दीड वर्षांपासून कोल्हापूरच्या रेल्वेचे प्रश्न मांडण्यासह ते सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे. यातून कोल्हापूरकरांची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित असलेली कोल्हापूर-कोकण रेल्वेची मागणी पूर्ण झाली. ते सर्व कोल्हापूरकरांचे यश आहे. रेल्वे व रोड पॅसेंजर्स असोसिएशनचे अध्यक्ष कृष्णराव सोळंकी म्हणाले, कोल्हापूर हे कोकण रेल्वेला तीन वर्षांत जोडण्यात यावे. प्लॅटफॉर्मची संख्या वाढविण्यात यावी.
पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी म्हणाले, कोल्हापूर-पुणे दुहेरीकरण व विद्युतीकरण, सांगली-कोल्हापूर शटल सर्व्हिस, आदी प्रलंबित मागण्यांची पूर्तता व्हावी.
स्टेशन प्रबंधक सुग्रीव मीना म्हणाले, कोकण रेल्वे प्रकल्पाच्या माध्यमातून आम्हाला कामाची रूपरेषा मिळाली आहे. खासदार महाडिक यांच्या प्रयत्नांतून अनेक प्रलंबित मागण्या पूर्ण होतील. त्याद्वारे रेल्वे सेवा आणि स्थानकाचे विकासाच्या दिशेने पाऊल पडेल, अशी आशा आहे. कार्यक्रमास मोहन शेटे, जयेश ओसवाल, अशोक कांबळे, आदींसह प्रवासी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
रेल्वे प्रशासनाकडून काहीच नाही
शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षपूर्ती साजरी करण्याचे कोणतेही नियोजन रेल्वे विभागाने केले नसल्याचे दिसून आले. याबद्दल काही नागरिक, प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. रेल्वे व रोड पॅसेंजर्स असोसिएशनच्या पुढाकारामुळेच संबंधित वर्षपूर्ती साजरी झाली.

Web Title: Striving for 'Model Station': Dhananjay Mahadik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.