कुंभी-कासारीसाठी चुरशीने ८२.४५ टक्के मतदान, वाढलेल्या टक्क्याचा फायदा कोणाला?; निकालाची उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 12:35 PM2023-02-13T12:35:28+5:302023-02-13T12:35:51+5:30

मतदारांना शोधण्यासाठी शिवारात

Strong 82.45 percent polling for Kumbi Factory Election, who benefits from increased percentage | कुंभी-कासारीसाठी चुरशीने ८२.४५ टक्के मतदान, वाढलेल्या टक्क्याचा फायदा कोणाला?; निकालाची उत्सुकता

कुंभी-कासारीसाठी चुरशीने ८२.४५ टक्के मतदान, वाढलेल्या टक्क्याचा फायदा कोणाला?; निकालाची उत्सुकता

googlenewsNext

कोपार्डे : कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत रविवारी करवीर, पन्हाळ्यासह पाच तालुक्यांतील १०५ केंद्रांवर अत्यंत चुरशीने २३ हजार ४३१ पैकी १९ हजार ३१९ (८२.४५ टक्के) मतदान झाले. करवीर तालुक्यातील खुपिरे व कोगे येथील बाचाबाचीचे प्रकार वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मृत वगळता बहुतांशी गावांत ९५ टक्क्यांपेक्षाही अधिक मतदान झाले. 

मतदानाचा वाढलेला टक्का पाहता, निवडणुकीतील चुरस लक्षात येते. माजी आमदार चंद्रदीप नरके, आमदार पी. एन. पाटील, आमदार विनय कोरे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. उद्या, मंगळवारी सकाळी आठपासून रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय सभागृहात मतमोजणी होणार आहे.

करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा व राधानगरी तालुक्यांतील १७९ गावांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या ‘कुंभी’चे २३ हजार ४३१ सभासद आहेत. गेली १८ वर्षे कारखान्यावर माजी आमदार चंद्रदीप नरके यांची सत्ता आहे. परंतु, यंदा आमदार पी. एन. पाटील, आमदार विनय कोरे यांनी ताकद लावल्याने जोरदार रस्सीखेच झाली. 

‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी उघडपणे विरोधी आघाडीस पाठिंबा दिला, तर चेतन नरके थेट प्रचारात उतरल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत आली. आरोप-प्रत्यारोपाने ही निवडणूक चांगलीच गाजली. कारखान्याच्या पाच वर्षांच्या कारभाराचा लेखाजोखा मांडत विरोधी आघाडीने चंद्रदीप नरकेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला, तर शेवटच्या टप्प्यात नरकेंनी आक्रमक होत, ‘भोगावती’च्या कारभारावर निशाणा साधला.

‘ब’ वर्गात ३१९ मतदान

‘अ’ वर्गचे २३ हजार ६३, तर ‘ब’ वर्गचे ३६८ सभासद होते. त्यापैकी ‘ब’ वर्गातील ३१९ संस्था प्रतिनिधींनी मतदानाचा हक्क बजावला.

मतदान बाहेर काढण्यासाठी चढाओढ

मतदान कमी, त्यात गावनिहाय असल्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसारखे मतदान बाहेर काढण्यासाठी दोन्ही आघाड्यांत चढाओढ पाहावयास मिळाली, त्यामुळे मतदानाचा आकडा वाढला.

वाढलेल्या टक्क्याचा फायदा कोणाला?

गेल्या दोन निवडणुकांपेक्षा यावेळेला मतदानाचा आकडा वाढला आहे. २३ हजार ४३१ पैकी जवळपास तीन हजार मृत सभासद आहेत. त्यापैकी १९ हजार ३१९ इतके मतदान झाले. वाढलेला टक्का कोणाच्या फायद्याचा ठरणार याविषयी उत्सुकता आहे.

कोगेत वातावरण तंग

कोगेमध्ये एका वयोवृद्ध महिलेचे मतदान करून घेण्यावरून सत्तारूढ व विरोधी आघाड्यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची उडाली. त्यामुळे गावात दुपारनंतर तणावाचे वातावरण राहिले.

मतदारांना शोधण्यासाठी शिवारात

एका एका मतासाठी दोन्ही आघाड्यांकडून शेवटपर्यंत प्रयत्न राहिले. सकाळी मतदानासाठी गर्दी असल्याने शेतात कामासाठी गेलेल्या मतदारांना शोधण्यासाठी समर्थक शिवारात पोहोचले होते.


आम्ही कुंभी-कासारीचा कारभार विश्वासार्हता, पारदर्शक आणि वचनबद्धता या त्रिसूत्रीवर चालविला. आमच्यावर विरोधकांनी केलेल्या निखालस आरोपांना सभासदांनी मतपेटीतून उत्तर दिले आहे. आमचे सर्वच्या सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. - चंद्रदीप नरके (नेते, नरके पॅनल).


सभासदांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले आहे. आजपर्यंत असे मतदान झाले नाही. ही परिवर्तनाची नांदी असून, सत्तांतर अटळ आहे - बाळासाहेब खाडे (नेते, शाहू आघाडी)

Web Title: Strong 82.45 percent polling for Kumbi Factory Election, who benefits from increased percentage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.