सावकारांविरूद्ध भक्कम पुरावे

By admin | Published: April 16, 2016 12:36 AM2016-04-16T00:36:43+5:302016-04-16T00:40:40+5:30

अमोल पवार प्रकरण : सावकारांच्या जामिनावर २५ एप्रिलला सुनावणी

Strong evidence against the lenders | सावकारांविरूद्ध भक्कम पुरावे

सावकारांविरूद्ध भक्कम पुरावे

Next

कोल्हापूर : बांधकाम व्यावसायिक अमोल पवार याला दहा ते तीस टक्के व्याजाने कर्जपुरवठा करून त्याची स्थावर मालमत्ता लिहून घेणाऱ्या संशयित चौदा सावकारांवर गुन्हा दाखल आहे. अटकेच्या भीतीने या सावकारांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जावर दि. २५ एप्रिलला अंतिम सुनावणी आहे. न्यायालयाने तपास यंत्रणेला ही सुनावणी होईपर्यंत सावकारांना अटक करू नये, असे लेखी कळविले आहे. त्यामुळे सावकारांची तात्पुरती अटक टळली असल्याचे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी शुक्रवारी सांगितले.
आजरा-आंबोली मार्गावर हाळोली फाट्यानजीक आय-२० कारसह जळालेल्या स्थितीत सापडलेल्या मृतदेहाचे गूढ स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उकलून या प्रकरणी कटाचा सूत्रधार असलेला अमोल व त्याचा भाऊ विनायक पवार या दोघांना अटक केली.
त्यांनी सावकारांकडून तीन कोटी ८५ लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्यांनी वसुलीसाठी तगादा लावून स्थावर मालमत्ता लिहून घेतली होती. या त्रासाला कंटाळून आपण मृत्यूचा बनाव केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी सावकारांची कसून चौकशी केली. त्यामध्ये कराराची कागदपत्रे मिळाली. अमोलची पत्नी रोहिणी पवार हिच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी १४ सावकारांवर गुन्हे दाखल केले. त्यामध्ये संशयित दत्ता नारायण बामणे, मोनिका प्रशांत सावंत, प्रशांत शिवाजीराव सावंत, जयसिंग जाधव, नीलेश जयसिंग जाधव, प्रफुल्ल आण्णासो शिराळे, पांडुरंग आण्णासो पाटील, रणजित अशोक चव्हाण, विकास कृष्णा खोत, सूरज हणमंतराव साखरे, बिपीन ओंकार परमार, अशोक बाबूराव तनवाणी, प्रकाश रमेश टोणपे, सतीश गणपतराव सूर्यवंशी, आदींचा समावेश आहे.
सर्वच सावकार राजकीय पक्षांशी निगडित असून त्यांनी कारवाई टाळण्यासाठी मोठी ‘फिल्डिंग’ लावली होती; परंतु पोलिसांनी या सर्वांवर खासगी सावकारकीचे गंभीर गुन्हे दाखल केले.
आपले प्रयत्न व्यर्थ ठरले, आता अटक होणार या भीतीपोटी सर्वच सावकारांनी वकिलांचे पाय धरत त्यांच्याकरवी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला.
दोषी सावकारांच्या विरोधात भक्कम पुरावे पोलिसांनी गोळा
केले आहेत. सुनावणीवेळी या सावकारांच्या कारवाईचा अहवाल न्यायालयास सादर करून त्यांचा जामीन फेटाळावा, अशी विनंती तपास यंत्रणेकडून केली जाणार असल्याचे निरीक्षक मोहिते यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)

अटकेची तयारी
सावकारांचा जामीन अर्ज न्यायालय फेटाळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे त्यांना त्याच दिवशी अटक करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. कदाचित त्यांना जामीन मंजूर झाल्यास एक दिवस आड पोलिस मुख्यालयात हजेरी लावण्याचे आदेश व्हावे, अशी विनंतीही तपास यंत्रणेकडून केली जाणार आहे.

Web Title: Strong evidence against the lenders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.