वीस टक्के घरफाळा वाढीला तीव्र विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:05 AM2017-09-15T00:05:39+5:302017-09-15T00:06:36+5:30
इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या अपिलीय समितीने घेतलेल्या २० टक्के घरफाळा वाढ कायम करण्याच्या निर्णयाला विविध स्तरांतून तीव्र विरोध केला जात आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या अपिलीय समितीने घेतलेल्या २० टक्के घरफाळा वाढ कायम करण्याच्या निर्णयाला विविध स्तरांतून तीव्र विरोध केला जात आहे. गुरुवारी ‘माकप’च्या शिष्टमंडळाने नगराध्यक्षा अलका स्वामी यांना निवेदन देऊन वाढीव घरफाळा रद्द करण्याची मागणी केली. यावेळी शिष्टमंडळाने पदाधिकाºयांना धारेवर धरले. याबाबत ठोस निर्णय न घेतल्यास नगरसेवकांच्या घरांवर मोर्चे काढण्याबरोबरच मंगळवारी (दि. १९) होणाºया पालिका सभेत घुसण्याचा इशारा दिला. यावेळी उडालेल्या शाब्दिक चकमकीमुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. तर इचलकरंजी नागरिक मंचने फटाके वाजवून व साखर वाटून उपहासात्मक निषेध नोंदविला. तसेच अन्यायी दरवाढ रद्द करावी, अशा घोषणा दिल्या.
त्यावर घरफाळा वाढीला आमचाही विरोध आहे; पण सरसकट घरफाळा वाढ रद्द करण्याचा अधिकार अपिलीय समितीला नाही. याबाबत पालिका सभेत चर्चा केली जाईल. अपिलीय समितीचे अध्यक्ष तथा प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना भेटून घरफाळा वाढीच्या विरोधातील तीव्रता सांगण्यात येईल, असे आश्वासन नगराध्यक्षा स्वामी यांनी यावेळी दिले.
प्रांताधिकारी शिंगटे यांच्या अध्यक्षतेखालील अपिलीय समितीने २0 टक्के घरफाळा वाढ कायम करण्याचा निर्णय दिला. त्यामुळे घरफाळावाढीच्या विरोधात नागरिकांतून तीव्र विरोध व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘माकप’च्या शिष्टमंडळाने गुरुवारी पालिकेत येऊन या निर्णयाच्या विरोधात आक्रमक शब्दांत भूमिका मांडली. प्राचार्य ए. बी. पाटील यांनी घरफाळा वाढीचा निर्णय कायद्याला धरून नसल्याचे सांगितले.
पदाधिकारी जनतेच्या बाजूने की विरोधात
पालिकेचे पदाधिकारी जनतेच्याच बाजूने आहेत की विरोधात आहेत, असा सवाल करीत शिष्टमंडळातील सदस्यांनी संताप व्यक्त केला. सध्या शहरात मंदीचे वातावरण असून, नागरी सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे २0 टक्के घरफाळा वाढ रद्द करावी, अशी मागणी केली. प्रशासनाकडून मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, अतिरिक्त मुख्याधिकारी पवन म्हेत्रे यांच्यासह ‘राष्टÑवादी’चे पक्षप्रतोद अशोक जांभळे, ‘भाजप’चे पक्षप्रतोद तानाजी पोवार, ‘ताराराणी’चे पक्षप्रतोद सागर यांनी घरफाळा वाढीबाबतची भूमिका स्पष्ट केली. घरफाळा वाढीला आमचाही विरोध असल्याचे त्यांनी सांगितले.