‘सेमी इंग्रजी’साठी कडक निर्बंध ...

By Admin | Published: May 5, 2016 12:53 AM2016-05-05T00:53:42+5:302016-05-05T00:54:20+5:30

शाळांच्या संख्येवर येणार मर्यादा : पात्र शिक्षक, सुविधा असतील तरच मान्यता

Strong restrictions for 'Semi English' ... | ‘सेमी इंग्रजी’साठी कडक निर्बंध ...

‘सेमी इंग्रजी’साठी कडक निर्बंध ...

googlenewsNext

कोल्हापूर : मराठी माध्यमाच्या शाळांमधील पटसंख्या टिकविण्यासाठी ‘सेमी इंग्रजी’चे वर्ग सुरू करण्याचा घाट सर्वच ठिकाणी घातला जात आहे; परंतु यापुढे सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता मागणाऱ्या शिक्षण संस्थांवर राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने कडक निर्बंध आणले जात आहेत. इंग्रजीमधून डी.एड्. केलेले शिक्षक आणि आवश्यक त्या सुविधा असतील, तरच अशा सेमी इंग्रजी वर्गांना मान्यता दिली जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाच्या या नव्या दृष्टिकोनामुळे सेमी इंग्रजीच्या शाळांच्या संख्येवर आता मर्यादा येणार आहेत.
मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या जोडीला आता सेमी इंग्रजी वर्गांचा एक नवीन पर्याय समोर आला आहे. पहिलीपासूनच सेमी इंग्रजी वर्गात इंग्रजी, सायन्स आणि गणित हे विषय इंग्रजीमधून, तर अन्य विषय मराठीमधून शिकविले जातात. सेमी इंग्रजीच्या वर्गांना चांगली मागणी असल्याने गेल्या काही वर्षात सर्वत्र अशा मोठ्या प्रमाणात शाळा सुरू झाल्या आहेत; परंतु जेथे सेमी इंग्रजीचे वर्ग आहेत, तेथील शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता कमी असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने एक तर इंग्रजी शाळा सुरू करा किंवा मराठी शाळा सुरू ठेवा, अशी भूमिका घेतली आहे.
जर मराठी शाळेत सेमी इंग्रजी वर्ग सुरू करायचे झाल्यास शालेय शिक्षण विभागातर्फे नियम व अटी लादण्यात आल्या आहेत. सेमी इंग्रजी वर्गासाठी नेमण्यात येणाऱ्या शिक्षकांनी पहिली ते दहावी तसेच डी.एड्.पर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून पूर्ण केले पाहिजे. स्वतंत्र अभ्यासक्रम, इंग्रजी पुस्तकांची लायब्ररी यांसह अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.
शिक्षक भरतीवेळी २0 टक्के शिक्षक हे इंग्रजी माध्यमाकरिता नेमले पाहिजेत, अशा अटी घालण्यात आलेल्या आहेत; परंतु ज्या शैक्षणिक संस्था आवश्यक पात्रतेचे शिक्षक नेमणार नाहीत, त्यांना सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात येणार नाही.
सेमी इंग्रजी वर्ग सुरू करायची इच्छा असूनही शिक्षण विभागाच्या नियमांमुळे अनेक संस्थांना सुरू करता येणार नाहीत.
नवीन शिक्षक नेमण्यास परवानगी नाही, मानधनावर शिक्षक घ्यायचे म्हटले तर ते परवडणारे नाही, त्यामुळे ‘सेमी’चे वर्ग सुरू करणे अडचणीचे होऊन बसले आहे. एकट्या कोल्हापूर शहरातून यावर्षी १३ नवीन प्रस्ताव शिक्षण उपसंचालकामार्फत शालेय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आले आहेत. त्यांना मान्यता मिळालेली नाही. महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीतर्फे नऊ शाळेत सेमीचे वर्ग सुरू करण्यासाठी मान्यता मागितली होती; परंतु त्यांना निकष पूर्ण होत नसल्याचे कारण देत ते नाकारले आहेत. (प्रतिनिधी)



‘सेमी’ची संख्या घटतेय
ज्या गतीने सेमी इंग्रजी वर्गांची संख्या वाढली, त्याच गतीने ती कमी होत असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले. कारण पहिली ते चौथीपर्यंतच्या प्राथमिक शाळेत शालेय शिक्षण विभागाचे नियम कोणीच पाळत नसल्याने गुणवत्तेत फरक दिसून येतो. त्यामुळे अनेक पालकांचा भ्रमनिरास होऊन मुलांना मराठी शाळेत घालणे पसंत केले. त्यामुळे ‘सेमी’ची संख्या घटत असल्याचे दिसून येते.


अनुदानित शाळेत पाचवी ते आठवी सेमी इंग्रजीच्या वर्गासाठी स्वतंत्र शिक्षक नेमण्यास मंजुरी मिळत नाही. बी.एस्सी.बी.एड्., अशी शैक्षणिक पात्रता धारण केलेले शिक्षक असे वर्ग घेऊ शकतात. त्यामुळे खास शिक्षक दिला जात नाही.
-प्रा. सी. एम. गायकवाड

Web Title: Strong restrictions for 'Semi English' ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.