पानसरेंच्या घरी कडक बंदोबस्त
By admin | Published: March 5, 2015 12:19 AM2015-03-05T00:19:49+5:302015-03-05T00:25:57+5:30
उमातार्इंच्या सुरक्षेचे कारण : हत्या प्रकरणातील महत्त्वाच्या, एकमेव साक्षीदार
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या सहचारिणी म्हणून अखेरपर्यंत त्यांना साथ देत गोळ्या झेललेल्या उमाताई पानसरे यांच्या सुरक्षेच्या कारणात्सव त्यांच्या घरासमोर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दोन दिवसांत उमाताई सर्वांशी थोडंफार बोलू शकत असल्या तरी अशक्तपणामुळे त्यांना पूर्णत: बरे होण्यास किमान दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.तब्बल १७ दिवसांच्या उपचारांनंतर मंगळवारी रात्री साडेदहा-अकराच्या दरम्यान उमाताई आपल्या आयडियल कॉलनीतील घरी आल्या. शस्त्रक्रिया झाल्याने त्या फारशा बोलू शकत नाहीत. बाहेरची धूळ किंवा व्यक्तींमुळे संसर्ग होण्याची भीती असल्याने कुटुंबीय, डॉक्टर आणि पोलीस अधिकारी यांच्याशिवाय अन्य कुणालाही घरात प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. अण्णांवर झालेल्या गोळीबाराच्या उमाताई या महत्त्वाच्या आणि एकमेव साक्षीदार आहेत. त्यांच्यामुळेच अण्णांच्या मारेकऱ्यांना शोधण्यास मदत मिळणार असल्याने उमातार्इंच्या सुरक्षेची अधिक काळजी पोलीस प्रशासनाच्यावतीने घेतली जात आहे. अण्णांवर हल्ला झाल्यापासून परिसरात पोलीस बंदोबस्त होताच; मात्र उमातार्इंना डिस्चार्ज मिळाल्यानंतर तो वाढविण्यात आला आहे. सध्या घराबाहेर पोलीस अधिकारी व कॉन्स्टेबल असे नऊजण तैनात आहेत. उमातार्इंच्या स्मिता आणि मेघा या दोन्ही मुली आणि सून मेघा या सगळ्याजणी त्यांची काळजी घेत आहेत. उमातार्इंची प्रकृती सुधारत आहे. खूप मोठ्या मानसिक आणि शारीरिक धक्क्यातून आता त्या बाहेर पडत असल्याने पूर्णत: बऱ्या व्हायला उमातार्इंना दोन महिने तरी लागतील, अशी माहिती स्नुषा मेघा पानसरे यांनी दिली.