हातकणंगलेत सत्ताधाऱ्यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:19 AM2021-05-03T04:19:13+5:302021-05-03T04:19:13+5:30
जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी तालुक्यात मोठ्या चुरशीने १०० टक्के मतदान पार पडले. सत्ताधाऱ्यांनी ...
जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी तालुक्यात मोठ्या चुरशीने १०० टक्के मतदान पार पडले. सत्ताधाऱ्यांनी ‘गोकुळ चांगलं चाललंय’, अशा मजकुराच्या पांढऱ्या टोप्या घालून एकाचवेळी ७८ मतदारांना केंद्रावर आणले, तर विरोधी आघाडीचे मतदार पिवळ्या टोप्या घालून केंद्रावर दाखल झाले.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी हातकणंगले तालुक्याचे मतदान येथील डांगे महाविद्यालयातील आदर्श विदयालयाच्या दोन खोल्यांमध्ये पार पडले. केवळ ९५ मतदार असल्याने गाजावाजा नव्हता. सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळी अकरापर्यंत केवळ १३ टक्के मतदान झाले होते, तर दुपारी एक वाजता मतदानाचा आकडा ९३ टक्क्यांवर पोहोचला. यावेळी एकूण ९५ मतदारांपैकी ८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. उर्वरित सहा मतदारांनी दुपारी २.३० ला मतदान केले.
विरोधी आघाडीचे आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, हातकणंगलेचे नगराध्यक्ष अरुण जाणवेकर, शिरोलीचे सरपंच शशिकांत खवरे यांच्यासह कार्यकर्ते मतदारांच्या स्वागतासाठी केंद्राबाहेर उभे होते. तसेच सत्ताधारी गटाकडूनही मतदारांच्या स्वागतासाठी जि. प. माजी अध्यक्षा शौमिका महाडिक व महाडिक समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हातकणंगले केंद्रावर माजी आमदार अमल महाडिक यांच्यासह जि. प. सदस्य राहुल आवाडे यांनी मतदान केले.
.......
एकूण मतदान : ९५
झालेले मतदान : ९५
१०० टक्के