थोरल्या दवाखान्यावरील विश्वास होतोय दृढ !
By admin | Published: April 12, 2017 04:01 PM2017-04-12T16:01:44+5:302017-04-12T16:01:44+5:30
वर्षभरात तब्बल ८२०० पेक्षा जास्त प्रसुती
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. ११ : कोल्हापूर : ‘जिल्ह्याची आरोग्यवाहिनी’ समजल्या जाणाऱ्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील (सीपीआर) प्रसूती विभागात या आर्थिक वर्षात तब्बल ८२०० प्रसूती झाल्या. त्यामध्ये स्वाभाविक (नॉर्मल) ५४४० तर सिझेरियन प्रसूती २७५७ झाल्या. या आकडेवारीमुळे सीपीआरमध्ये बाळ-बाळंतिणीवर चांगल्या प्रकारचे उपचार होतात, हे स्पष्ट होत आहे.
सीपीआरमध्ये कोल्हापूर जिल्ह्यासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली व सातारा या शेजारच्या जिल्ह्यातून रोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात. सीपीआरमधील प्रमुख विभागांपैकी एक म्हणजे प्रसूती विभाग होय. एक एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत सुमारे ८२०० प्रसूती झाल्या आहेत. त्यामध्ये सर्वाधिक नॉर्मल डिलिव्हरीचा समावेश आहे. सीपीआर रुग्णालय ‘गरिबांचे रुग्णालय’ म्हणून ओळखले जाते. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाला राज्य सरकारकडून मिळालेल्या निधीमुळे सीपीआरने आता कात टाकली आहे. येथे आता अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. प्रसूती विभागात गरिबांसह श्रीमंत वर्गातील महिलाही प्रसूत होत आहेत. विशेष म्हणजे हा विभाग २४ तास कार्यरत असल्यामुळे याठिकाणी येणाऱ्या महिलांवर तत्काळ उपचार होतात. येथे सेवेबरोबर स्वच्छताही चांगली आहे.
प्रसूती विभाग आणखी सुसज्ज करण्याची गरज...
प्रसूती विभागात सध्या शंभर बेड आहेत. शहराच्या मानाने बेडची संख्या कमी आहे. त्यातच शहरातील इतर भागांतून आणि विशेषत : ग्रामीण भागातून याठिकाणी येणाऱ्या गर्भवती महिलांची संख्या जास्त आहे.साधारणत: या विभागाला सध्या १३० ते १५० बेड (कॉट) गरज आहे. त्यामुळे प्रसूती विभागात बेडची संख्या वाढवावी, अशी मागणी नातेवाईकांमधून होत आहे.
सामाजिक संस्थांचा मदतीचा हात...
प्रसूती विभागातील सोयी-सुविधांसाठी अनेक स्वयंसेवी संस्था, संघटनांनी मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे या विभागात कोणतीच कमतरता बाळ-बाळंतिणीला भासत नाही. दोन आठवड्यांपूर्वी एका स्वयंसेवी संस्थेने या ठिकाणी दोन अॅक्वागार्ड (पाणी शुद्धिकरण यंत्रणा) नव्याने बसविली आहेत.
आॅपरेशन थिएटर : १६ परिचारिका
गायनकॅलॉजी विभाग : १०
सिझर विभाग : १६
सहाय्यक प्राध्यापक : ३
लेक्चरर : ७
वैद्यकीय अधिकारी : ४
वरिष्ठ निवासी डॉक्टर : ४
कनिष्ठ निवासी डॉक्टर : ८