पूरबाधित घरांचे स्ट्रक्चरल आॅडिट --‘केडीएमजी’चे मदतकार्य गतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 01:18 AM2019-08-20T01:18:07+5:302019-08-20T01:19:13+5:30

शहरातील पूरबाधित घरांचे ‘आयएसएसई’तर्फे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती ‘केडीएमजी’चे समन्वयक रविकिशोर माने यांनी दिली.

Structural audit of flooded homes | पूरबाधित घरांचे स्ट्रक्चरल आॅडिट --‘केडीएमजी’चे मदतकार्य गतीने

पूरबाधित घरांचे स्ट्रक्चरल आॅडिट --‘केडीएमजी’चे मदतकार्य गतीने

Next
ठळक मुद्दे: उपनगरात स्वच्छता मोहीम; शिरोळसह करवीर, शहरात साहित्य वाटप

कोल्हापूर : येथील कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुपच्या वतीने (केडीएमजी) सोमवारी शिरोळ आणि करवीर तालुक्यांसह कोल्हापूर शहराच्या पूर्व व उत्तर बाजूच्या उपनगरांत पूरबाधितांना नवीन कपडे, ब्लँकेट, चादरी वाटप केले. लक्ष्मीपुरी जयंती नाला, महावीर कॉलेज, न्यू पॅलेस परिसरात स्वच्छता मोहीम राबवून परिसरात औषध फवारणी केली. शहरातील पूरबाधित घरांचे ‘आयएसएसई’तर्फे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती ‘केडीएमजी’चे समन्वयक रविकिशोर माने यांनी दिली.

‘केडीएमजी’च्या या रेस्क्यूमध्ये सुमारे ४० संघटना एकत्र येऊन मदतकार्यासाठी सक्रिय झाल्या आहेत. सोमवारी शिरोळ तालुक्यातील दानवाड, रांगोळी, नृसिंहवाडी, करवीर तालुक्यातील वळीवडे, वडणगे, आडूर, वाकरे, भामटे, कळे-कळंबे, साबळेवाडी या गावांसह शहरात कदमवाडी, जाधववाडी, भोसलेवाडी, उलपेमळा, सुतारमळा (लक्षतीर्थ वसाहत) या पूरग्रस्त भागात बाधितांना मदत पाठवली. मदतीमध्ये बिस्किटांच्या बॉक्ससह स्वच्छतेसाठी फिनेलचे कॅन, चादरी, ब्लँकेट, लहान मुलांसह महिला-पुरुषांनाही नवीन कपडे, चटई तसेच आवश्यक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे बॉक्स दिले.
पूरबाधित लक्ष्मीपुरी जयंती नाला परिसर, महावीर कॉलेज ते न्यू कॉलेज, महावीर कॉलेज ते डायमंड हॉस्पिटल या मार्गावरही ‘केडीएमजी’च्या वतीने ट्रॅक्टर, जेसीबी यंत्राद्वारे स्वच्छता मोहीम राबविली. त्यानंतर औषध फवारणी करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत सुमारे ४५० स्वयंसेवक गमबूट, हातात ग्लोज, मास्क घालून सहभागी झाले होते.

सोलापूरमधून १२ स्ट्रक्चरल इंजिनिअर्स आले असून, त्यांच्यामार्फत शहरातील सर्वेक्षण सुरू आहे. उपजिल्हाधिकारी स्मिता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे यांच्या सहकार्याने हे इंजिनिअर्स काम करीत आहेत. त्यांनी शहरातील पूरबाधित घरांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे काम सुरू केले आहे.


‘केडीएमजी’तर्फे २ कोटींची औषधे
महापूर ओसरल्यानंतर उद्भवणाऱ्या आजारांच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी ‘केडीएमजी’च्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात गेल्या आठवड्यात सुमारे दोन कोटी रुपयांहून अधिक औषधे पाठविली. योग्यवेळी योग्य ठिकाणी नियोजनबद्ध औषधे पोहोचल्याने साथींच्या आजाराची तीव्रता वेळीच रोखता आली. नागाळा पार्क परिसरातील पितळी गणपती मंदिरानजीक केमिस्ट भवनमध्ये स्वतंत्र कार्यालयात ही औषधे कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनमार्फत संकलन केली. ही संकलित केलेली औषधांचे किट तयार करून ती पूरग्रस्त भागात पाठविली. प्रथम शहरात स्थलांतरित झालेल्या पूरगस्तांच्या ३९ कॅम्पमध्ये डॉक्टरांमार्फत आरोग्य तपासणी शिबिर घेतली.


‘ए.आय.एस.एस.पी.एम.एस.’चे विद्यार्थी आज कोल्हापुरात
पुण्यातील आॅल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटी प्रायमरी हायस्कूलचे सुमारे २५० विद्यार्थी आणि त्यांचे प्राचार्य, शिक्षक आज, मंगळवारी कोल्हापुरात
येत आहेत.

‘केडीएमजी’च्या नेतृत्वाखाली हे विद्यार्थी मंगळवार आणि बुधवार अशी दोन दिवस शहरात स्वच्छता मोहीम राबविणार आहे. त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था माजी आमदार मालोजीराजे यांनी केली आहे.

शिरोळ तालुक्यात औरंगाबादचे डॉक्टर पथक सक्रिय
औरंगाबाद येथून आलेल्या डॉक्टरांच्या पथकांमार्फत शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी, औरवाड, गौरवाड, आदी पूरबाधित भागांत सोमवारी आणि आज, मंगळवारी दोन दिवस पूरग्रस्तांची आरोग्य तपासणी शिबिर सुरू आहे.

औषधे जमा
महाराष्ट केमिस्ट असोसिएशन : ४५ लाख
क्रिडाई, बारामती : ३.५ लाख
याशिवाय जितो संघटनेसह राज्यातून विविध संघटनांनी औषधे पाठवली.
 

महापुरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीला परतवून लावण्यासाठी विविध
४० संघटना एकाच छत्राखाली येऊन तातडीने सक्रिय झाल्या. या एकीमुळे पूरबाधित क्षेत्रात रेस्क्यूपासून खाद्यपदार्थ पोहोचविणे, औषधोपचार करणे, स्वच्छता मोहीम राबविण्याची प्रक्रिया विनाअडचणी गतीने झाल्या. त्याचेच फलित म्हणून कोल्हापूर काही दिवसांतच पूर्वपदावर आले.
- रविकिशोर माने, समन्वयक, केडीएमजी.


महापुरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीनंतर ‘केडीएमजी’ने केलेल्या आवाहनानुसार महाराष्टÑासह बाहेरूनही मोठ्या प्रमाणावर मदत आली. स्वयंसेवकांचेही काम कौतुकास्पद राहिले.
- संजय शेटे, अध्यक्ष,
कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असो.
 

Web Title: Structural audit of flooded homes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.