खासगी कंपनीकडून ‘स्ट्रक्चलर आॅडिट’
By admin | Published: August 25, 2016 12:25 AM2016-08-25T00:25:40+5:302016-08-25T00:41:40+5:30
‘शिवाजी’सह चार पुलांचा समावेश : राज्यातील १५ पुलांची होणार तपासणी
प्रवीण देसाई -- कोल्हापूर --ब्रिटिशकालीन ऐतिहासिक पुलांचे ‘स्ट्रक्चलर आॅडिट’ करण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने खासगी कंपनीची नियुक्ती केली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शिवाजी पुलासह राज्यातील १५ पुलांची तपासणी होणार आहे. ही कंपनी पावसाळ्यानंतर आपल्या कामाला सुरुवात करणार आहे.
महाड (जि. रायगड) येथील ब्रिटिशकालीन पुल ३ आॅगस्टला वाहून गेल्यानंतर जीवित आणि वित्तहानी झाली. याप्रकारामुळे राज्य सरकारला विरोधकांसह जनतेच्या रोषास सामारे जावे लागले. यानंतर खडबडून जागे झालेल्या सरकारने राज्यातील सर्वच पुलांचे स्ट्रक्चलर आॅडिट करण्याचे आदेश दिले. त्यामुळे राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असलेल्या राज्यातील पन्नाशी पार केलेल्या सर्वच पुलांचे आॅडिट पावसाळ्यानंतर होणार आहे. राष्ट्रीय महामार्गावरील पूलही याला अपवाद नाहीत. या पुलांवर नियंत्रण असलेल्या केंद्रीय रस्ते मंत्रालयाकडून महाराष्ट्रातील ऐतिहासिक म्हणजे ब्रिटिशकालीन पुलांचे आॅडिट केले जाणार आहे. या संदर्भात काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे संबंधित विभागाचे मंत्री व वरिष्ठ अधिकारी यांच्यात बैठक झाली. यामध्ये हे आॅडिट करण्यासाठी खासगी कंपनीची नियुक्ती करण्याचा निर्णय झाला.
नियुक्ती करण्यात आलेली ही कंपनी सरकारच्या पॅनेलवरील आहे. या कंपनीच्या तज्ज्ञांकडून कोल्हापूर जिल्ह्यातील शिवाजी पुलासह शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर, वारुळ व करंजोशी यांसह राज्यातील १५ ब्रिटिशकालीन पुलांची तपासणी केली जाईल. हे काम पावसाळा संपल्यानंतर सुरू होईल.
ही कंपनी पुलांची पाहणी करणार असून, यामध्ये काही त्रुटी आढळल्यास उपायही सुचवून ते करण्याबाबतचा अहवाल तत्काळ केंद्र सरकारला सादर करणार आहे. याची प्रत संबंधित जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनाही दिली जाणार आहे. शिवाजी पुलासह जिल्ह्यातील चार पुलांची तपासणी करण्यासाठी महिन्याभरानंतर ही कंपनी कोल्हापुरात येणार आहे.
पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलासह जिल्ह्यातील अन्य चार पुलांचे महिन्याभरानंतर स्ट्रक्चलर आॅडिट होणार आहे. केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या कंपनीकडून ते केले जाईल.
- आर. के.बामणे, कार्यकारी अभियंता,
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,