बंद व्हेंटिलेटर सुरू करण्यासाठी पुन्हा धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:20 AM2021-05-29T04:20:05+5:302021-05-29T04:20:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पीएम केअर फंडातून सीपीआरला मिळालेले आणि सध्या बंद असलेले ४२ व्हेंटिलेटर सुरू करण्यासाठी प्रशासनाची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पीएम केअर फंडातून सीपीआरला मिळालेले आणि सध्या बंद असलेले ४२ व्हेंटिलेटर सुरू करण्यासाठी प्रशासनाची पुन्हा धडपड सुरू झाली आहे. पण व्हेंटिलेटर पुरविलेल्या कंपन्या बेपत्ता असल्याने सीपीआर प्रशासनाक़डून पुन्हा एकदा स्थानिक अभियंत्याच्या मदतीने बाजारात साहित्य मिळते का याचा शोध घेतला जात आहे. ‘पीएम केअरमधून व्हेंटिलेटर पुरविणाऱ्या कंपन्या बेपत्ता’ असे लोकमतमध्ये वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर पुन्हा एकदा बंद व्हेंटिलेटर सुरू करण्यासाठी प्रशासनाची धडपड गतिमान झाली आहे.
कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने व्हेंटिलेटर बेडची मागणी वाढत आहे. अशा स्थितीत सीपीआरमधील ४२ व्हेंटिलेटर बंद आहेत. हे व्हेंटिलेटर पुरविणाऱ्या कंपन्याही बेपत्ता असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे हे व्हेंटिलेटर कसे दुुरुस्त करायचा प्रश्न सीपीआर प्रशासनासमोर आहे. कंपन्याकडून दुरूस्तीसाठीचे मार्ग बंद झाल्याने स्थानिक बाजारात साहित्य मिळते का, याचीही चाचपणी सुरू केली आहे. बंद व्हेंटिलेटर विविध वार्डात पडून असल्याने त्यांची विल्हेवाटच लावण्यात येणार आहे.
वेगवेगळ्या कंपन्यांकडून वेगवेगळे सुटे भाग घेऊन व्हेंटिलेटर तयार करून ती देण्यात आली आहेत. त्यामुळे कंपन्यांचा शोध घेण्यातही प्रशासनाला अडचणीचे ठरत आहे. ही व्हेंटिलेटर पुरवताना ती राज्यासाठी ठराविकच कंपन्यांना कंत्राट दिले होते की वेगवेगळ्या याचाही थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे कंपन्यांपर्यंत पोहोचणे हेच दिव्य ठरले आहे. प्रत्येक जिल्ह्यांसाठी वेगवेगळ्या कंपन्यांनी व्हेंटिलेटर पुरवली असून त्याच्या दर्जाबद्दल सार्वत्रिक तक्रारी आहेत.
कोट
सीपीआरमधील बंद व्हेंटिलेटर दुरूस्तीसाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी सरकारी पातळीवरही पाठपुरावा केला जात आहे. वेळोवेळी कंपन्यांना ई-मेलही पाठवला आहे. पण प्रतिसाद मिळालेला नाही. यामुळे स्थानिक पातळीवर साहित्य उपलब्ध झाल्यास बंद व्हेंटिलेटर सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
एस. एस. मोरे, अधिष्ठाता
--