कोल्हापूर ‘हद्दी’चा संघर्ष तीव्र
By admin | Published: August 25, 2016 12:57 AM2016-08-25T00:57:02+5:302016-08-25T00:58:08+5:30
चर्चा बस्स, आत्ताच निर्णय घ्या ; अन्यथा १ सप्टेंबरपासून उपोषण --एक इंचभरही जागा देणार नाही ; जनमत चाचणी घ्या
चर्चा बस्स, आत्ताच निर्णय घ्या ; अन्यथा १ सप्टेंबरपासून उपोषण
कोल्हापूर : शहराच्या हद्दवाढप्रश्नी अनेक बैठका झाल्या, चर्चा झाली. आता यापुढे सरकारने चर्चा बंद करून तातडीने निर्णय घ्यावा, असे आवाहन बुधवारी कोल्हापूर महानगरपालिकेत झालेल्या हद्दवाढ कृती समितीच्या बैठकीत करण्यात आले. ३० आॅगस्टला मुंबईतील बैठकीत निर्णय न झाल्यास १ सप्टेंबरपासून शहरात आमरण उपोषणाने आंदोलनास सुरुवात केली जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर अश्विनी रामाणे होत्या.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आवाहनास प्रतिसाद देत हद्दवाढ कृती समिती व हद्दवाढ विरोधी कृती समितीने आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले. या पार्श्वभूमीवर बुधवारी महानगरपालिकेत ही बैठक आयोजित करण्यात आली होती. हद्दवाढीवर आता अधिक चर्चा करुन वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारण्यापेक्षा हद्दवाढ करण्याचा निर्णय घ्यावा, असे आवाहन सरकारला करण्यात आले. आंदोलन स्थगित केले आहे, याचा अर्थ ते थांबले असा होत नाही. ३० आॅगस्टला मुंबईतील बैठकीत जर निर्णय झाला नाही तर मात्र १ सप्टेंबरपासून आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा बैठकीत देण्यात आला.
बैठकीच्या प्रारंभी कृती समितीचे निमंत्रक (पान ९ वर)
आर. के. पोवार यांनी आंदोलनाचा तसेच सरकार पातळीवर सुरू असलेल्या चर्चेचा तपशील सांगितला तर सभागृह नेते प्रवीण केसरकर यांनी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या द्विसदस्य समितीच्या अहवालानुसार हद्दवाढ करण्यात यावी, अशी मागणी केली. नामदेव गावडे यांनी आंदोलन स्थगित केले असून ते थांबणार नाही, असा इशारा दिला. चर्चेत किती वेळ घालविणार, असा सवाल राजू लाटकर यांनी केला. चर्चेतून मार्ग निघतो, पण किती चर्चा करायची,आता चर्चा थांबवून निर्णय घेण्याची वेळ असल्याचे लाटकर म्हणाले.
आतापर्यंत ज्या शहरांची हद्दवाढ झाली तेथे आधी निर्णय घेतला मग हरकती मागविल्या होत्या. हीच पद्धत राज्य सरकारने कोल्हापूरच्याबाबतीत स्वीकारावी, असे आवाहन स्थायी समितीचे सभापती मुरलीधर जाधव यांनी केले. यावेळी संदीप देसाई, महेश जाधव, संपतराव चव्हाण-पाटील, किशोर घाडगे, बाबा पार्टे, लाला गायकवाड, अनुराधा खेडकर, पंडितराव सडोलीकर, बजरंग शेलार, उमा बनसोडे, माधुरी लाड, आदिल फरास यांची भाषणे झाली.
समर्थक
हद्दवाढीवर वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारण्यापेक्षा सरकारने निर्णय घ्यावा
द्विसदस्य समितीच्या अहवालानुसार हद्दवाढ करावी: प्रवीण केसरकर
आंदोलन स्थगित केले असून ते थांबणार नाही: नामदेव गावडे
चर्चेत किती वेळ घालविणार :
राजू लाटकर
आधी निर्णय घ्या; मग हरकती
मागवा : मुरलीधर जाधव
एक इंचभरही जागा देणार नाही ; जनमत चाचणी घ्या
कोल्हापूर : मुंबईत मंगळवारी होणाऱ्या बैठकीत काय प्रस्ताव आहे हे माहीत नाही; पण १८ गावेच नव्हे तर हद्दवाढीसाठी इंचभरही जागा देणार नसल्याचा ठराव हद्दवाढविरोधी कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला. हद्दवाढीबाबत ग्रामीण भागांतून जनमत चाचणी घ्यावी, असेही मत यावेळी मांडले.
हद्दवाढविरोधासाठी आज, गुरुवारपासून उपोषण करण्यात येणार होते; पण मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हे आंदोलन स्थगित केले. त्याबाबतच्या घडामोडींची माहिती देण्यासाठी व मंगळवारच्या मुंबईतील बैठकीबाबत नियोजनासाठी येथील शासकीय विश्रामगृहावर प्रस्तावित १८ गावांतील पदाधिकारी व नेते यांची बैठक निमंत्रक नाथाजीराव पोवार यांनी बोलावली. अध्यक्षस्थानी माजी आमदार संपतराव पवार-पाटील होते. आमदार चंद्रदीप नरके, अमल महाडिक व डॉ. सुजित मिणचेकर, आदी प्रमुख उपस्थित होते.
हद्दवाढसमर्थक आणि विरोधक यांनी आमरण उपोषणाबाबत एकमेकांना आव्हान दिल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, यासाठी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या विनंतीला मान देऊन आंदोलन तूर्त (पान ९ वर)
स्थगित केले, त्याबाबतचे विश्लेषण निमंत्रक नाथाजी पोवार यांनी केले.
यावेळी अनेकांनी सूचना मांडताना, हद्दवाढविरोधी कृती समितीच्या आंदोलनात फूट पाडण्यासाठी शासन मोजकीच पाच-सहा गावे समाविष्ट करून घेत असल्याबाबत शंका उपस्थित केली; पण नेत्यांनी अशा कोणत्याही गावांना वाऱ्यावर सोडून हद्दवाढीत समाविष्ट होऊ देणार नसल्याचा खुलासा केला.
यावेळी माजी आमदार संतपराव पवार-पाटील, ‘गोकुळ’चे संचालक बाबा देसाई, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, आदींनीही परखड विचार मांडले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील, एस. आर. पाटील, राजू माने, महेश चव्हाण, आदी उपस्थित होते.
जनमत चाचणी घ्या : चंद्रदीप नरके
मुद्द्यावरून गुद्द्यावर येण्याची आमची संस्कृती नाही, असे सांगत आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, आमचा लढा हा दोन वा तीन गावांसाठी नव्हे, तर १८ गावे हद्दवाढीत समाविष्ट होऊ न देण्यासाठी आहे. हद्दवाढीसाठी ग्रामसचिवांमार्फत समिती तयार करून ग्रामीणची जनमत चाचणी घ्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करणार आहे.
गावांची वज्रमूठ कायम : अमल महाडिक
हद्दवाढीत एकही गाव समाविष्ट होऊ देणार नसल्याबाबत आमदार अमल महाडिक यांनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले, अठरा गावांची वज्रमूठ कायम राहील. आम्ही अगर ग्रामीण जनता शहराच्या विकासासोबत आहे. मुंबईत होणाऱ्या बैठकीत अनेक गोष्टी पारदर्शीपणे समोर येतील. हद्दवाढीसारखा कोणताही निर्णय आम्ही गावावर लादणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तडजोड होणार नाही : सुजित मिणचेकर
मुंबईत होणाऱ्या बैठकीत १८ गावांबाबत आम्ही ठाम आहोत. हद्दवाढीसाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, इंचभरही जागा हद्दवाढीसाठी देणार नाही, असे आमदार डॉ. सुजित मिणचेकर म्हणाले.
तुमचं सारं बिनपट्ट्याचं
भगवान काटे म्हणाले, आमची वडिलोपार्जित जमीन शहरात असताना कायद्याने लेआउट तयार करून आम्ही टीडीआर घेतला आहे. आमदार नरके यांच्यावरही हिरव्या पट्ट्यातील बांधकामांचे आरोप होत आहेत; पण या महापालिकेतील पदाधिकाऱ्यांचे सारेच बिनपट्यात आहे, असाही टोला लगावला.
आता, बिनधास्त रहा...
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. आता अडीच वर्षे बिनधास्त रहा; पण सावध रहा. काळजी करू नका. अशा परिस्थितीत अधिसूचना निघत नाही, असे आमदार नरके यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
शिवाजी पेठेची संस्कृती
हद्दवाढ समर्थकांनी शिवाजी मंदिरामध्ये मेळावा घेतला. हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत माणसं. शिवाजी पेठेची संस्कृती चांगली आहे. पेठेत मोठमोठी ज्ञानी माणसे होऊन गेली. येथील माणसं चांगलं काय आणि वाईट काय हे जाणतात; म्हणूनच मेळाव्यातील उपस्थिती रोडावल्याची टीका नरके यांनी केली.
म्हशी, गायी घेऊन मोर्चा
मुंबईतील बैठकीत हद्दवाढीच्या बाजूने निर्णय दिल्यास १८ गावांतील नागरिक आपली जनावरे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढतील, असाही इशारा नेत्यांनी दिला.
——————
फोटो व ओळी नंतर देत आहे...
तानाजी पोवार...
———————-
विरोधक
कोणत्याही गावांना वाऱ्यावर सोडून हद्दवाढीत समाविष्ट होऊ देणार नाही.
आता अडीच वर्षे बिनधास्त ; पण सावध रहा : चंद्रदीप नरके
गावांची वज्रमूठ कायम : अमल महाडिक
तडजोड होणार नाही : सुजित मिणचेकर
महापालिकेतील पदाधिकाऱ्यांचे सारेच बिनपट्ट्यात : भगवान काटे