सर्पमित्रांचा सापांच्या जीवितासाठी संघर्ष
By admin | Published: September 20, 2015 10:46 PM2015-09-20T22:46:59+5:302015-09-20T23:24:24+5:30
सुविधांची मागणी : हजारो सापांना मिळाले जीवदान
संजय माने- टाकळी--साप म्हटले की काठ्या घेऊन त्याला मारण्याचा प्रयत्न असतो. मात्र टाकळी येथील सर्पमित्रांकडून मात्र सर्प हे शेतकऱ्यांचा मित्र व निसर्गचक्राचा एक भाग असल्याची जाणीव करून देत सापांबद्दल असलेला गैरसमज पुसून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. टाकळीतील लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्व जातीचे साप पकडून निर्जनस्थळी सोडून जीवदान देण्याचे काम या सर्पमित्रांनी केले आहे. त्यामुळे टाकळी गाव हे सर्पमित्रांचे गाव म्हणून ओळखले जात आहे.
विषारी सर्प, नाग, घोणस, फुरसे, मण्यार, अर्धविषारी, मांजऱ्या, हरिण टोळ, बिनविषारी धामण, तस्कर, कुकरी, गवत्या, नानेती, दिवड, डुरक्या घोणस, धुळनागीणसह अशा अनेक प्रकारच्या सापांना मनुष्य वस्तीतून पकडून टाकळीतील सर्पमित्र बाळासाहेब पाटील, सुभाष पाटील, अजित पाटील, नितीन पाटील, स्वराज्य पाटील, सम्राट पाटील, प्रवीण देसाई, महावीर पाटील यांच्यासह टाकळीतील शेकडो तरुण गेल्या दहा वर्षात सापांना जीवदान देण्याचे काम करत आहेत. साप हा शेतकऱ्यांचा मित्र असून, निसर्गचक्रात सापाची महत्त्वाची भूमिका असल्याचेही सर्पमित्रांकडून समजावून सांगण्यात येते. सापाला पकडताना त्यास इजा होऊ नये यासाठी टाकळीतील सर्पमित्रांनी तैवान येथून स्रेक स्टीक मागवली आहे. या स्टीकमुळे सापास कोणत्याही प्रकारची इजा होत नाही व त्याला पकडणेही सोपे जाते.
सर्पमित्र अनिल इंगवले यांच्याकडून सर्पमित्रांनी साप पकडण्याचे तंत्र अवगत केले आहे. सर्व जातीच्या सापांची माहिती व्हावी म्हणून येथील सर्पमित्रांनी पुण्यातील राजीव गांधी सर्प उद्यानास भेट दिली आहे. सापांविषयीच्या माहितीची विविध पुस्तके, सीडीच्या माध्यमातून सापांची माहिती त्यांनी घेतली आहे. बोलवाड, सुभाषनगर, मल्लेवाडी, एरंडोली, बेडग, शिरोळ, कोल्हापूर जिल्ह्यातील आळतेसह विविध भागातून मनुष्य वस्तीत असलेले साप पकडण्यासाठी टाकळीतील सर्पमित्रांना बोलाविण्यात येते. साप पकडण्यासाठी सर्पमित्रांकडून कोणताही मोबदला घेतला जात नाही.
सापांबद्दल ग्रामस्थांत गैरसमज!
सापांची प्रणयक्रीडा पाहिल्यास डोळे जातात, साप डाव धरतो, सापाला केस असतात, साप जानावरांचे दूध पितो, असे अनेक गैरसमज ग्रामस्थांत आहेत. मात्र या सर्पमित्रांकडून सर्वकाही समजावून सांगितले जाते. उंदीर पिकांची मोठ्याप्रमाणात नासाडी करतात. उंदरांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सापांची संख्याही तितकीच असली पाहिजे. त्यासाठी शेतात साप सोडले जातात.