उजेडासाठी संघर्ष... पदरात अंधार!

By Admin | Updated: July 20, 2014 23:19 IST2014-07-20T23:08:27+5:302014-07-20T23:19:31+5:30

‘आरबीएसके’ डॉक्टरांची व्यथा : संपामुळे जिल्ह्यातील ६७ जण सेवामुक्त

The struggle for light ... darkness! | उजेडासाठी संघर्ष... पदरात अंधार!

उजेडासाठी संघर्ष... पदरात अंधार!

सातारा : राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या संपाला पाठिंबा दिल्याबद्दल राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत (आरबीएसके) काम करणाऱ्या ६७ कंत्राटी डॉक्टरांना सेवामुक्त करण्यात आल्याने त्यांचे भवितव्य अंधारले आहे. संप मिटून दहा दिवस उलटून गेले, तरी त्यांना सेवेत सामावून घेतले गेले नाही. आता तर या कार्यक्रमांतर्गत नवीन भरतीची कुणकूण लागल्याने हे डॉक्टर नखशिखान्त हादरले आहेत.
राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमात ‘बीएएमएस’ डॉक्टरांना अकरा महिन्यांच्या करारावर कंत्राटी पद्धतीने सेवेत घेतले जाते. महिना १४ हजार ८०० रुपये अशा तुटपुंज्या मानधनावर हे डॉक्टर अंगणवाडी तपासणीपासून शस्त्रक्रियेनंतरचा ‘फॉलो-अप’ घेण्यापर्यंत पडेल ते काम करतात. दरवर्षी मानधनात किमान वाढ अपेक्षित असताना तीही मिळत नाही. याच मानधनावर पाच-पाच वर्षे काम केलेले डॉक्टर्स जिल्ह्यात आहेत. राज्यात एकंदर ५४४ तर जिल्ह्यात ६७ डॉक्टर्स कार्यरत आहेत.
महाराष्ट्र असोसिएशन आॅफ गॅझिटेड मेडिकल आॅफिसर्स (मॅग्मो) या राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संघटनेने विविध मागण्यांसाठी नुकताच बेमुदत संप पुकारला होता. ‘भविष्यात सरकारी नोकरीत चांगली संधी मिळावी, भवितव्य घडावे यासाठी या संपाला पाठिंबा द्यावा. भविष्यात संघटना तुमच्या पाठीशी राहील,’ असे ‘मॅग्मो’च्या पदाधिकाऱ्यांनी ‘आरबीएसके’ डॉक्टरांना सांगितले होते. त्यामुळे ‘आरबीएसके’ डॉक्टरही पाठिंबा म्हणून संपात सहभागी झाले. तुटपुंज्या मानधनात थोडीफार तरी वाढ होईल, असे संपावर जाताना त्यांना वाटले होते. मात्र, सात जुलैला संप मिटला आणि त्याच दिवशी ‘आरबीएसके’ डॉक्टरांच्या हातात सेवामुक्त केल्याचे पत्र पडले.
दहा दिवस उलटून गेले तरी जिल्ह्यातील एकाही ‘आरबीएसके’ डॉक्टरचे निलंबन मागे घेतले गेले नाही अथवा कुणालाही फेरनियुक्ती दिलेली नाही. राज्यपातळीवर आरोग्य मंत्री आणि सार्वजनिक आरोग्य खात्याचे सचिव तसेच जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना संपात सहभागी झाल्याबद्दल या डॉक्टरांनी माफीनामेही लिहून दिले आहेत. तरीही त्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.
‘आरबीएसके’ योजनेअंतर्गत नव्याने डॉक्टरांची भरती होणार असल्याची कुणकूण आता या ६७ डॉक्टरांना लागली आहे. या भरतीसाठी पुन्हा अर्ज करण्यास ते पात्र असणार नाहीत; किंबहुना कोणत्याही सरकारी सेवेसाठी ते यापुढे पात्र असणार नाहीत, असेही त्यांना तोंडी सांगितले गेले आहे. दुसरीकडे, ज्यांच्या संपात हे डॉक्टर सहभागी झाले, त्या ‘मॅग्मो’च्या पदाधिकाऱ्यांकडून आजअखेर ‘आरबीएसके’ डॉक्टरांना दिलासा देणारी एकही कृती झाली नाही. ‘आरबीएसके’बरोबरच ‘अस्थायी बीएएमएस’ डॉक्टरही संपात सहभागी झाले होते. ‘मॅग्मो’च्या कार्यक्षेत्रात ते येत असल्यामुळे संघटना त्यांच्यासाठी काही करू शकेल; मात्र ‘आरबीएसके’ डॉक्टरांना आता जणू भवितव्यच राहिले नाही, अशी त्यांची धारणा झाली आहे. (प्रतिनिधी)

-संपाला पाठिंबा दिल्यास मानधनात वाढ होईल, ही आशा भाबडी ठरली
-मानधनावर काम करता-करता सरकारी सेवेत सामावून घेतले जाईल, हे स्वप्नही भंगले
-आता सरकारी सेवेचे दरवाजे कायमस्वरूपी बंद झाल्याचे सांगितले जात असल्याने चिंता

९६ टक्के उद्दिष्टपूर्ती करणारे टांगणीला
‘आरबीएसके’ डॉक्टरांना अंगणवाडी तपासणीपासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या तपासणीपर्यंत अनेक कामे करावी लागतात. रजिल्ह्यात शून्य ते अठरा वयोगटातील ५९८ मुले हृदयरुग्ण असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यातील ३७४ मुलांवर शस्त्रक्रियाही करण्यात आली. ‘आरबीएसके’ योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या उद्दिष्टाची ९६ टक्के पूर्तता झाली आहे. असे असताना तपासणीपासून शस्त्रक्रियेनंतरच्या ‘फॉलोअप’पर्यंत सर्वकाही करणाऱ्या ६७ डॉक्टरांचे भवितव्य मात्र टांगणीला लागले आहे.

Web Title: The struggle for light ... darkness!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.