बैलाचा जीव वाचविण्याची धडपड अखेर सार्थकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 11:45 AM2021-03-13T11:45:53+5:302021-03-13T11:49:45+5:30
wildlife kolhapur- गगनबावडा येथे वसंत शिंदे यांच्या घरांच्या मागील बाजूला असणाऱ्या खोल विहिरीत पडलेल्या बैलाला बाहेर काढण्यात रेस्क्यू टीम व गगनबावडा ग्रामस्थांना आठ तासांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर यश आले.
मेघा जाधव
साळवन : गगनबावडा येथे वसंत शिंदे यांच्या घरांच्या मागील बाजूला असणाऱ्या खोल विहिरीत पडलेल्या बैलाला बाहेर काढण्यात रेस्क्यू टीम व गगनबावडा ग्रामस्थांना आठ तासांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर यश आले.
याबाबत अधिक माहिती अशी, गगनबावडा येथे वसंत शिंदे यांच्या विहीरीत येथीलच सचिन गावडे यांचा बैल गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास कोसळला. उन्हाळ्यामुळे या विहिरीत पाणी कमी होते. ही घटना काही ग्रामस्थांनी पाहीली आणि या बैलाला बाहेर काढण्यासाठी लोकांची पळापळ सुरू झाली. मात्र विहीर अत्यंत अरूंद असल्याने बैलाला बाहेर काढण्यात मर्यादा येवू लागल्या.
याबाबतची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला देण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन पथकाने सुनिल कांबळे यांच्या नेतृत्वाखालील रेस्क्यू टीम गगनबावडा येथे दाखल झाली. विहिरीतील पाणी बाहेर काढल्यानंतर रेस्क्यू टीमने ग्रामस्थांच्या मदतीने या बैलाला विहीरीतून मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास बाहेर काढण्यात यश आले. लाइटच्या प्रकाशात तब्बल आठ तास बैलाचा जीव वाचविण्यासाठी चाललेली धडपड अखेर सार्थकी लागली.
यावेळी रेस्क्यू टीमसह गुरुनाथ कांबळे, उपसरपंच मुस्ताक वडगावे व येथील युवकांनी परिश्रम घेतले. हा बैल किरकोळ जखमी झाला आहे. एका मुक्या जिवाला वाचविण्यासाठी रेस्क्यू टीम व गगनबावडा येथील युवकांनी केलेली धडपड त्या बैलाला जीवदान देणारी ठरली.