काळजवडेत महिलांनी उभारला दारूबंदीचा लढा

By admin | Published: January 2, 2015 11:49 PM2015-01-02T23:49:32+5:302015-01-03T00:11:53+5:30

सह्यांच्या मोहिमेला प्रतिसाद : गेले महिनाभर प्रयत्न, लवकरच होणार मतदान; तारखेकडे लक्ष

The struggle of women in Kaljavad has been started | काळजवडेत महिलांनी उभारला दारूबंदीचा लढा

काळजवडेत महिलांनी उभारला दारूबंदीचा लढा

Next

बाजारभोगाव : पन्हाळा तालुक्यातील काळजवडेतील महिलांनी दारूबंदीसाठी लढा उभारला आहे. जांभळी खोऱ्यातील दारूबंदी चळवळीमुळेमहिलांच्यात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. लवकरच दारूबंदीसाठी मतदान होणार असून, आता बाटली आडवी करण्यासाठी मतदानाच्या तारखेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काळजवडे गावात गेल्या दहा-बारा वर्षांपासून चोरटी दारू विक्री सुरू होती. त्यात सरकारमान्य बीअर शॉपी सुरू झाली आहे. त्यामुळे तरुण पिढी दारूच्या आहारी गेल्याने सार्वजनिक शांतता धोक्यात आली आहे. किरकोळ बाचाबाचीचे रूपांतर मोठ्या भांडणात होत असल्याने महिला मोठ्या मानसिक दबावाखाली आहेत. त्यामुळे दारूबंदी व्हावी, यासाठी सरपंच मालुबाई नाथा सुतार, कल्पना श्रीपती सुतार यांच्या नेतृत्वाखाली महिला एकत्रित आल्या असून, गेले महिनाभर दारूबंदीसाठी लढा उभारला आहे. गावातील दारू विक्रेत्यांच्या घरावर मोर्चा काढला. पोलीस यंत्रणेसह विविध पातळीवर निवेदन दिले. मात्र, खाकी वर्दीवाल्यांनी लढ्यांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य न केल्याने विक्रेत्यांचा आत्मविश्वास दुणावला. परिणामी, महिलांनी दारूबंदीसाठी निर्धार कायम ठेवून चळवळ सुरूच ठेवली. त्यांना आता गावातूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
महिलांच्या चळवळीला नाथा सुतार, संभाजी पाटील, ज्ञानू पाटील, विलास सुतार यांनी पाठिंबा दिला. बीअर शॉपी बंद करण्याच्या शासकीय पद्धतीचा अवलंब करून महिलांच्या सह्यांची मोहीम यशस्वीपणे पार पडली. त्यामुळे शासनाच्या नियमाप्रमाणे शॉपीच्या बंदीसाठी उभी बाटली-आडवी बाटलीसाठी लवकरच मतदान होणार आहे.
गेले महिनाभर आत्मविश्वासाने उभी केलेली चळवळ मोठ्या निर्धाराने यशस्वी करण्यासाठी मतदानाची तारीख कधी जाहीर होते, या निर्णयाकडे येथील महिलांचे लक्ष लागून राहिले आहे. (वार्ताहर)


दारूबंदी चळवळ मोठ्या निर्धाराने उभी केली आहे. काही लोकांचा याला विरोध आहे. मात्र, त्यांना त्यांची चूक कळून येईल. दारूबंदीमुळे तारुण्यात आलेली पिढी वाचेल, यासाठी दारूबंदीसाठी जीव पणाला लावूून चळवळ यशस्वी करू.
- कल्पना श्रीपती सुतार,
दारूबंदी चळवळीच्या प्रणेत्या.

Web Title: The struggle of women in Kaljavad has been started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.