मल्टिस्टेटविरोधात संघर्ष करणारे कट्ट्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:24 AM2021-04-22T04:24:45+5:302021-04-22T04:24:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा दुधातील अभ्यास कमी आहे, असे दोन्ही आघाड्यांना वाटले असावे, म्हणूनच विचार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा दुधातील अभ्यास कमी आहे, असे दोन्ही आघाड्यांना वाटले असावे, म्हणूनच विचार झाला नसावा. मल्टिस्टेटविरोधात संघर्ष करणारे सगळे कट्ट्यावर बसले आणि त्या बाजूने असणारे किंवा घरात बसणाऱ्यांना उमेदवारी दिल्याचा आरोप ‘स्वाभिमानी’चे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी केला.
‘गोकुळ‘ निवडणुकीसाठी दोन्ही आघाड्यांतील उमेदवारांची घोषणा झाली असून, त्यामध्ये ‘स्वाभिमानी’ , ’शेकाप’सह दिग्गजांना संधी मिळालेली नाही. याबाबत राजू शेट्टी म्हणाले, दूध दर, मल्टिस्टेटविरोधात आम्ही संघर्ष केला. कदाचित दोन्ही आघाड्यांना आमचा दुधातील अभ्यास कमी वाटत असेल, त्यामुळे त्यांनी विचार केला नसेल. मल्टिस्टेटविरोधात संघर्ष करणाऱ्यांना कट्ट्यावर बसवले आणि मल्टिस्टेटचे समर्थन करणारे व त्यावेळी घरात बसलेले सध्या रिंगणात आहेत. सध्या लॉकडाऊन असल्याने बैठक घेता येत नाही, आज, गुरुवारी पदाधिकाऱ्यांशी बोलून निर्णय घेतला जाईल.
‘शेकाप’चा दोन दिवसांत निर्णय
सहा वर्षे ‘गोकुळ’विरोधात सामान्य दूध उत्पादकांसाठी लढा दिला. आता कोणी काय केले, यावर फार चर्चा करणे उचित नाही. येत्या दोन दिवसांत सर्वांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे माजी आमदार संपतराव पवार यांनी सांगितले.
मोेरे यांची अद्याप सावध भूमिका
‘बिद्री’चे माजी संचालक विजयसिंह मोरे यांनी अद्याप सावध भूमिका घेतली आहे. याबाबत संपर्क साधला असता, निर्णय काय घ्यायचा, एवढेच त्यांनी सांगितले.
दिलीप पाटील विरोधी आघाडीसोबतच
मागील निवडणुकीतील पराभव भरून काढायचा म्हणून गेली सहा वर्षे काम केले. मात्र संधी मिळाली नाही; तरीही आपण पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासोबत राहणार असल्याचे ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष दिलीप पाटील (शिरोळ) यांनी सांगितले.