हक्काच्या मतदारांसाठी इच्छुकांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:24 AM2020-12-06T04:24:41+5:302020-12-06T04:24:41+5:30

कोल्हापूर : महापालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये हक्काचा मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी इच्छुक, विद्यमान नगरसेवकांकडून धडपड सुरू झाली आहे. ...

Struggling for aspiring voters | हक्काच्या मतदारांसाठी इच्छुकांची धडपड

हक्काच्या मतदारांसाठी इच्छुकांची धडपड

Next

कोल्हापूर : महापालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये हक्काचा मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी इच्छुक, विद्यमान नगरसेवकांकडून धडपड सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने शनिवारपासून मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात आपल्या जवळचे नव मतदारांची नोंदणी कशी जास्त होईल, यासाठी त्यांनी फिल्डिंग लावली आहे. नवीन मतदार नोंदणी करण्याचे आवाहन करणारे सोशल मीडियावरून संदेश पाठविले आहेत.

कोरोनामुळे कोल्हापूर महापालिकेची निवडणूक अनिश्चित काळासाठी लांबणीवर गेली आहे. पुढील सहा महिन्यांत कोणत्याहीक्षणी निवडणूक जाहीर होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे काही विद्यमान नगररसेवक आणि इच्छुकांकडून आतापासून जनसंपर्क सुरू केला आहे. आरक्षणाचा विचार करून काहींनी दोन प्रभागांवर डोळा ठेवला आहे. येथील आपले हक्काचे मतदान कोणते याचे अडाखे मांडले जात आहेत. मतदानासाठी किती तारखेपासूनची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार याबाबत अद्यापही राज्य निवडणूक आयोगाकडून कोणतेही स्पष्ट आदेश आलेले नाहीत.

यामध्येच भारत निवडणूक आयोगाने मतदारनोंदणी पुनर्निरीक्षण कार्यक्रम हाती घेतला असून, शनिवारी (दि. ५) आणि रविवारी (दि.६) तसेच १२ व १३ डिसेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन केले आहे. नवमतदार नोंदणी, मतदान ओळखपत्रावरील नाव, पत्त्यामध्ये दुरुस्ती करणे, नाव एका यादीतून दुसऱ्या यादीत स्थलांतरित करणे, मृत व्यक्तीचे नाव वगळणे अशी कामे करता येणार आहेत. यामुळे नुकतेच १८ वर्षे पूर्ण झालेले नवमतदार नोंदणी करण्याची इच्छुकांना पर्वणी आली आहे.

चौकट -

पश्चातापाची वेळ येऊ नये यासाठीच धडपड

महापालिकेची निवडणूक चुरशीने होत असते. केवळ चार ते पाच मताने पराभव झाल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. जवळच्याच व्यक्ती, कार्यकर्ते अथवा समर्थकाने मतदार यादीत नाव नसल्यामुळे मतदान केले नसल्याचा निकालानंतर पश्चाताप करावा लागू नये म्हणून काहींकडून मतदार नोंदणीसाठी धडपड सुरू आहे.

सोशल मीडियावरून आवाहन

इच्छुकांकडून सोशल मीडियावरून मतदार नोंदणी करण्याचे आवाहन केले जात आहे. नियम व कोणती कागदपत्रे लागणार आहे, याची माहिती या माध्यमातून दिली जात आहे. जास्तीत जास्त नवमतदारांपर्यंत हा संदेश पोहोचविला जात आहे. काही प्रभागात पत्रकाचेही वाटप केले आहे.

Web Title: Struggling for aspiring voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.