सराफ व्यापाऱ्यांचा धडक मोर्चा
By admin | Published: March 12, 2016 12:32 AM2016-03-12T00:32:31+5:302016-03-12T00:32:42+5:30
अबकारी कर मागे घ्या : गांधी टोप्या, हातात फलक घेऊन तीन हजारजण सहभागी
कोल्हापूर : केंद्र सरकारने अर्थसंकल्पात सराफ व्यवसायावर एक टक्का अबकारी कर लागू केला आहे; त्यामुळे व्यापाऱ्यांना व्यवसाय करणे कठीण बनले आहे. याच्या निषेधार्थ शुक्रवारी कोल्हापूर सराफ व्यापारी संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. ‘व्यापारी एकजुटीचा विजय असो...’ ‘एक टक्का अबकारी कर रद्द झालाच पाहिजे...’ अशा घोषणांनी परिसर दणाणून निघाला. पांढऱ्या गांधी टोप्या व हातात फलक घेतलेले सुमारे तीन हजार व्यापारी यामध्ये सहभागी झाले होते. जिल्ह्यातील विविध व्यापारी संघटना व शिवसेनेने मोर्चाला पाठिंबा व्यक्त केला.
सकाळी साडेअकराच्या सुमारास गुजरी कॉर्नर येथून मोर्चाला सुरुवात झाली. महाद्वार रोड, भेंडे गल्ली, छत्रपती शिवाजी चौक, माळकर तिकटी, महाराणा प्रताप चौक, आईसाहेब महाराज पुतळा, लक्ष्मीपुरी, व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे हा मोर्चा आला. या ठिकाणी घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली. रणरणत्या उन्हातही व्यापाऱ्यांची संख्या लक्षणीय होती.
मागण्यांचे निवेदन कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांच्या नेतृत्वाखालील कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष सुरेश गायकवाड, चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष आनंद माने, संचालक प्रदीप कापडिया, पारस ओसवाल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे यांना सादर केले.
यावेळी भरत ओसवाल म्हणाले, केंद्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये सोन्याच्या व रत्नजडित दागिन्यांवर एक टक्का अबकारी कर लावल्याबद्दल सराफ व्यापाऱ्यांनी गेल्या दहा दिवसांपासून व्यापार बंद ठेवला आहे. हा कर लागू झाल्यास आम्हाला व्यापार करण्यास अडचणी येणार आहेत. त्याचा भार ग्राहकांवर पडणार आहे. तसेच या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या घटकांनाही याची झळ पोहोचणार आहे. त्यामुळे आमच्या भावना प्रशासनाला कळाव्यात, यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. गुरुवारी (दि. १७) दिल्ली येथील रामलीला मैदानावर हा कर लादल्याचा निषेध नोंदविला जाणार आहे. यासाठी देशभरातून व्यापारी एकवटणार असून, जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनीही यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
सुरेश गायकवाड, जयसिंगपूर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रसाद धर्माधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे उपाध्यक्ष राजेश राठोड, महेश साजणीकर, बसवराज जरी, महेश मोरे, तानाजी जाधव, शिवाजी पोवार, बाबासाहेब काशीद, हॉटेल मालक संघाचे शंकरराव यमगेकर, अरुण चोपदार, कुमार दळवी, राजकुमार शेटे, शिवाजी हंडे, तेजपाल शहा, आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
व्यापारी, उद्योजकांचा बंदला संमिश्र प्रतिसाद
अबकारी कर व पॅनकार्ड सक्तीच्या निषेधार्थ सराफ व्यावसायिकांचे आंदोलन सुरू आहे शिवाय त्यांनी ‘बेमुदत बंद’ पुकारला आहे. रूपांतरित कराच्या नोटिसा, त्यासाठी जप्तीची टांगती तलवार, प्रस्तावित घरफाळा वाढ, २० टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव यामुळे सर्वसामान्य व्यापारी, उद्योजक व व्यावसायिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे व्यापारी, उद्योजकांची एकजूट आवश्यक बनल्याने सराफ व्यावसायिकांच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने शुक्रवारी दुपारपर्यंत व्यवसाय बंद ठेवून सराफ, सुवर्णकारांच्या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक मोर्चात सहभागी झाले होते. ‘बंद’मुळे शहरातील महाद्वार रोड, गुजरी, भेंडे गल्ली, भाऊसिंगजी रोड, जोतिबा रोड परिसरात सकाळी अकरा ते दुपारी दोनपर्यंत काही शुकशुकाट दिसून आला. दुपारपर्यंतच्या बंदला संमिश्र प्रतिसाद लाभला. दरम्यान, गेल्या दहा दिवसांपासून सराफ बाजारपेठ बंद आहे. त्यामुळे या कालावधीत सुमारे १०० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली असल्याचे सांगण्यात आले.