संकट मागे टाकून जगणे सावरण्याची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:25 AM2021-07-29T04:25:45+5:302021-07-29T04:25:45+5:30

कोल्हापूर : हौसेने मे महिन्यात घर रंगवून घेतलेले. टीव्हीसाठी कपाट केले होते. दारात नवीन तुळशी वृंदावन बांधले होते. यंदा ...

Struggling to recover from the crisis | संकट मागे टाकून जगणे सावरण्याची धडपड

संकट मागे टाकून जगणे सावरण्याची धडपड

googlenewsNext

कोल्हापूर : हौसेने मे महिन्यात घर रंगवून घेतलेले. टीव्हीसाठी कपाट केले होते. दारात नवीन तुळशी वृंदावन बांधले होते. यंदा ऊसही चांगला आला होता. सोयाबीन तरारले होते. शाळेत कॉम्प्युटर बसवले होते. ग्रामपंचायतीत खुर्च्या नवीन घेतल्या होत्या. ध्यानीमनी नसताना कृष्णा, वारणेचे पाणी वाढत गेले आणि आता फक्त जिथे, तिथे चिखलच चिखल आणि घाण कुजका वास. शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील अनेक गावांत ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत बुधवारी गावोगावी हेच चित्र पाहायला मिळाले. फक्त गावाच्या नावात बदल, दुर्दशा सगळीकडे तीच; परंतु जे संकट आले ते मागे टाकून लोकांची जगणे सावरायची धडपड सगळीकडे दिसून आली.

स्थळ १

शिरोळ नृसिंहवाडी रस्ता

नृसिंहवाडीला छातीभर पाण्यातून पुजारी निघालेले. पोलीस त्यांना अडवत होते. स्मशानभूमीत पाणी शिरल्याने शेजारीच रस्त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचा एक वेगळा वास वातावरणात. पुराच्या कुजक्या वासात मिसळलेला. रस्त्याकडेच्या घरात कमरेच्या वर पाणी. रयत शिक्षण संस्थेच्या शिरोळमधील माध्यमिक शाळेत पूरग्रस्त राहिलेले. जनावरे बाहेर बांधलेली. तिकडे दत्त कारखान्यावर पॉलिटेक्निकलच्या इमारतीतही पूरग्रस्तांना ठेवले होते. यातील अर्जुनवाड्याचे ग्रामस्थ पाणी उतरल्याने जायच्या तयारीत.

२८०७२०२१ कोल शिरोळ अंत्यसंस्कार

शिरोळ येथील स्मशानभूमी महापुराच्या पाण्यात गेल्यामुळे नृसिंहवाडी रस्त्यावरच निधन झालेल्या व्यक्तीवर बुधवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

२८०७२०२१ कोल शिरोळ ०१

दत्त कारखान्यावरील अर्जुनवाड्याचे हे ग्रामस्थ गावाकडे जाण्याच्या तयारीत.

स्थळ २

उदगाव

गावातील सखल भागात अजूनही पाणी साठलेले. दुर्गंधी सुटलेली. अंगणवाडी मदतनीस आतील चिखलांचे पाणी बाहेर काढत होत्या. स्वच्छता मोहीम चालली होती. जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, सदस्य एकत्र आलेले. दरवर्षी पाणी येतेय. स्वच्छतेसाठी साधने अपुरी असल्याचे सांगण्यात येते. मग आवश्यक साहित्य आणि औषधे पाठवण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले जाते.

२८०७२०२१ कोल उदगाव

उदगाव अंगणवाडीची अशी स्वच्छता सुरू होती.

स्थळ ३

घुणकी

मोठे गाव; पण वारणेच्या पाण्याने तीन दिवसांपूर्वी भरून गेले होते. गावात प्रवेश करतानाच एका बाजूला कचऱ्याचा ढीग साचलेला. गावातील आधीच मोडकळीला आलेली घरे पडलेली. गावाच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये हरभरा, तांदूळ, बाजरी, गव्हाची निम्मी अर्धी पोती पडलेली. अचानक रात्रीतून पाणी वाढलेले. धान्यसुद्धा हलवायला वेळ मिळाला नव्हता. पुढच्या गल्लीत शाळकरी पोरांनी आपली वह्या पुस्तके वाळायला ठेवली होती. त्याच्या पुढे रंगीबेरंगी कपडे ट्राॅलीवर आणि फरशीवर वाळत घालण्यात आलेले.

२८०७२०२१ कोल घुणकी हाऊस

२८०७२०२१ कोल स्कूल बुक्स

घुणकीत शाळकरी मुलांनी आपली वह्या, पुस्तके वाळत घातली आहेत.

२८०७२०२१ कोल वेगळा फोटो

घुणकीत पाणी असे वाढत गेले की, घरातले कपडेसुद्धा बरोबर घेता आले नाहीत. हे सगळे ओलेकच्च कपडे सुकवायचे काम आता सुरू आहे.

स्थळ ४ नवे पारगाव

गावात गेल्या गेल्याच आठ- नऊ ग्रामपंचायतींच्या महिला कामगार स्वच्छता करत होत्या. इथेही घरे पडलेली. घरातून कचरा बाहेर आणून ठेवलेला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी त्यांच्या अडचणी मांडतात. जाताना शेताकडे बघवत नव्हते. सोयाबीन कधीच कुजून मातीमोल झालेले.

स्थळ ५ निलेवाडी

ई-लर्निंगसाठी संगणकांनी सुसज्ज असलेली निलेवाडी शाळेच्या प्रत्येक खोलीत पाणी गेलेले. सगळे संगणक खराब झालेले. समोर पाण्याचे तळे साठलेले. नकाशे, सुविचार आणि आकर्षक रंगांनी रंगवलेली शाळा आता भकास वाटत होती. आजूबाजूचा ऊस पडला होता. गावातून आलेली कशाकशाची पोतीही उसात पडलेली. ग्रामपंचायतीचे दप्तरही भिजून गेलेले. कार्यालय स्वच्छ करून खुर्च्या वाळण्यासाठी बाहेर आणून ठेवलेल्या. ग्रामस्थ गोळा झालेले. नुकसानभरपाईची मागणी केली जात होती. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण त्यांना प्रक्रिया समजून सांगत होते. ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न आता यातून सावरायचे कसे.

२८०७२०२१ कोल निलेवाडी स्कूल

२८०७२०२१ कोल निलेवाडी ग्रामपंचायत

Web Title: Struggling to recover from the crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.