खोटे कारण सांगून एसटीचा प्रवास..? नाही रे बाबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:29 AM2021-04-30T04:29:08+5:302021-04-30T04:29:08+5:30
कोल्हापूर : कोरोना संसर्गाचा कहर वाढू लागल्यानंतर बहुतांशी सर्वसामान्य प्रवाशांनी स्वत:हून एसटीच्या प्रवासी वाहतुकीला नाकारले आहे. त्यामुळे कोल्हापूर विभागाला ...
कोल्हापूर : कोरोना संसर्गाचा कहर वाढू लागल्यानंतर बहुतांशी सर्वसामान्य प्रवाशांनी स्वत:हून एसटीच्या प्रवासी वाहतुकीला नाकारले आहे. त्यामुळे कोल्हापूर विभागाला मोठा फटका बसला आहे. त्यात शासनाने अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापनातील कर्मचाऱ्यांनाच प्रवास करण्यास मुभा दिली. त्यातही प्रवासासाठी लागणाऱ्या कारणांचा सबळ पुरावा दिल्यानंतर वाहक अशा प्रवाशांना बसमध्ये प्रवेश देत आहेत.
कोरोनाच्या काळात खोटी कारणे सांगून कोण बहाद्दर एसटीतून प्रवास करतात का हे ‘लोकमत’ने प्रत्यक्ष जाऊन तपासले. तर त्यामध्ये असा प्रकार होत नसल्याचे निदर्शनास आले. आता जे लोक प्रवास करीत आहेत ते अत्यावश्यक सेवेतीलच असल्याचे स्पष्ट झाले. या सेवेसाठी एसटीच्या बारा आगारातून रोज २२ बसेसमधून १५०० प्रवासी ३ हजार किलोमीटरचा प्रवास करतात. सक्त सूचना असल्याने वाहकही सर्वसामान्य प्रवाशांना एस.टी.बसेसमध्ये प्रवास करण्यास देत नाहीत. महामंडळाचे अधिकारी अशा बसेसची मार्गावर तपासणी करीत आहेत. प्रवाशांची ओळखपत्रे अथवा डाॅक्टरांचे पत्र वा ई-पासची वाहकांकडून तपासणी केली जाते. अंत्यसंस्कारासाठी निघालोय हे कारण ऐकून प्रवेश दिला जात नाही.
कोल्हापूर-गडहिंग्लज मार्गावर सर्वाधिक फेऱ्या मार्गावर रोज ४ बसेसच्या माध्यमातून ८ फेऱ्या व ५४७ प्रवासी प्रवास करतात. कारण चंदगड, आजरा या बसस्थानकातून एकही बस प्रवासी नसल्याने सुटत नाही. विशेष सोय म्हणून कागल पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीकरीता ६ फेऱ्या होतात. त्यातून १४६ प्रवासी प्रवास करतात. ही सोय शासनाच्या सुचनेनुसार सुरू आहे.
एकूण आगार -१२
निरंक आगार - गगनबावडा, आजरा, चंदगड (प्रवासी नसल्याने एकही बस बाहेर नाही)
अत्यावश्यक सेवेसाठी कार्यरत बसेस -२२
रोजची प्रवासी संख्या - १५००
रोजचे अंतर - ३००० कि.मी
कोट
ओळखपत्र अथवा डाॅक्टरांचे पत्र, अत्यावश्यक सेवेतील पास, पोलीस दलाचा नवा ई-पास असल्याशिवाय वाहक बसमध्ये प्रवेश देत नाहीत. सर्वसामान्यांना प्रवासास मुभा दिली जात नाही.
शिवराज जाधव,
विभागीय वाहतूक अधिकारी, कोल्हापूर विभाग, एस.टी.महामंडळ