एस.टी.ची १४ वाहनांना धडक

By admin | Published: May 25, 2017 01:33 AM2017-05-25T01:33:22+5:302017-05-25T01:33:22+5:30

दोन ठार : नऊजण गंभीर; वाहनांचा चुराडा; उमा टॉकीज चौकातील थरारक घटना

STs strike to 14 vehicles | एस.टी.ची १४ वाहनांना धडक

एस.टी.ची १४ वाहनांना धडक

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : येथील गजबजलेल्या उमा टॉकीज चौकात पार्वती टॉकीजकडून येणाऱ्या बेधुंद एस. टी.चालकाने चौदा वाहनांना धडकून दोघांना चिरडले. या भीषण अपघातात दोघे जागीच ठार झाले; तर नऊजण गंभीर जखमी झाले. देवास शामराव घोसरवाडे (वय ४०, रा. कांडगाव, ता. करवीर), सुहास युवराज पाटील (२२, उचगाव, ता. करवीर) अशी मृतांची नावे आहेत. ही हृदयद्रावक घटना बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.
अपघातस्थळी रस्त्यावर ठिकठिकाणी रक्ताचा सडा पडला होता; तर चुराडा झालेली वाहने रस्त्यावर अस्ताव्यस्त पडली होती. दुर्घटनेनंतर आरडाओरडा, गोंधळ, आदी वातावरणामुळे परिसरात हलकल्लोळ माजला होता. एस. टी.ची टाकी फुटून डिझेल रस्त्यावर पसरले होते. हे विदारक दृश्य अंगावर शहारे आणणारे होते. नागरिकांनी जखमींना मिळेल त्या वाहनाने तत्काळ ‘सीपीआर’मध्ये दाखल केले.
जखमींमध्ये एस. टी.चालक रमेश सहदेव कांबळे (४२, रा. कांडगाव, ता. करवीर), पोलीस हवालदार राजाराम भीमराव पाटील (५७, रा. जीवबा नाना पार्क, आपटेनगर), विक्रम विठ्ठल घोरपडे (३३, रा. पाचगाव, ता. करवीर), बाबूराव केशव वडणगेकर (६१, रा. शाहूपुरी, कुंभार गल्ली), सतीश कृष्णात पाटील (२०, रा. मुटकेश्वर, ता. गगनबावडा), प्रतिभा योगेश नाळे (२८, रा. सांगरूळ, ता. करवीर), राजाक्का गुलाब पाटील (४०, रा. वाशी, ता. करवीर), श्रीपती ईश्वर रवळकर (४७), पांडुरंग गुंडू पाटील (५०, दोघे रा. दोनवडे, ता. करवीर), आदींचा समावेश आहे.
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सीपीआर रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी भेट दिली.

एसटीला रक्ताची चटक : या घटनेनंतर पुण्यात २५ जानेवारी २०१२ ला मनोरुग्ण चालक संतोष माने यांने नऊ लोकांना उडवल्याच्या घटनेची आठवण ताजी झाली. परंतू तिथे ज्या एसटीने (एमएच १४ बीटी १५३२) लोकांना उडविले होते, कोल्हापुरातील घटनेतही तीच एसटी आहे. त्यामुळे या एसटीला रक्ताची चटक लागली आहे की काय अशी प्रतिक्रिया महामंडळाच्या अधिकाऱ्यांनीच व्यक्त केली.

हुपरीहून रंकाळा बसस्थानकाकडे ३५ प्रवासी घेऊन एस. टी. बस (एमएच १४, बीटी १५३२) येत होती. सायंकाळी सहाच्या सुमारास पार्वती टॉकीजकडून ती उमा टॉकीजच्या दिशेने आली.
यावेळी चौकातील सिग्नल लागल्याने या मार्गावरील वाहने थांबून होती. बेधुंद चालक रमेश कांबळे याला एस. टी. थांबविता आली नाही. त्याने थेट समोरील एकापाठोपाठ चौदा वाहनांना धडकून दोघाजणांना चिरडले.
त्यानंतर आझाद चौकाकडे जाणाऱ्या कोपऱ्यावरील विद्युत खांबाला धडकून बस थांबली. बसखाली चिरडून देवास घोसरवाडे व सुहास पाटील या दोघांचा जागीच मृत्यू झाला; तर धडकेमध्ये दोन महिलांसह आठजण गंभीर जखमी होऊन रस्त्यावर विव्हळत पडले.
कुणाच्या डोक्याला, छातीला, हाता-पायांना गंभीर दुखापती झाल्या होत्या. रस्त्यावर ठिकठिकाणी रक्ताचा सडा पडला होता.
दुर्घटनेनंतर आरडाओरडा, गोंधळ, आदी वातावरणामुळे परिसरात हलकल्लोळ माजला होता. बसचालक कांबळे हा स्टिअरिंगवर बेशुद्धावस्थेत पडला होता. नागरिकांनी त्याच्यासह इतर जखमींना ‘सीपीआर’मध्ये दाखल केले.
एस. टी.च्या धडकेत वाहने रस्त्यावर अस्ताव्यस्त पडली होती. बसची टाकी फुटून डिझेल रस्त्यावर विखुरले होते. हे विदारक दृश्य अंगावर शहारे आणणारे होते.
घटनेचे वृत्त पोलिसांना समजताच शहरातील चारीही पोलीस ठाण्यांचे निरीक्षक, कर्मचारी, अग्निशामक दलाचे जवान, रुग्णवाहिका घटनास्थळी आल्या. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने या मार्गावरील चारीही बाजूंची वाहतूक बंद केली.
सुमारे दोन तासांच्या प्रयत्नानंतर रस्त्यावरील एस. टी. बससह अन्य अपघातग्रस्त वाहने हलविण्यात पोलिसांना यश आले.

थरारक दृश्य... आणि एकच हाहाकार
वेळ सायंकाळी ५.४५ वाजताची. हुपरी ते रंकाळा ही एस. टी. बस (एमएच १४ बीटी १५३२)मध्ये सुमारे ३५ प्रवासी घेऊन धावत होती. बस पार्वती चित्रमंदिरमार्गे उमा चित्रमंदिर चौक ते सुभाष रोडमार्गे पुढे दसरा चौकाकडे मार्गस्थ होणार होती. ही बस काही प्रवासी उतरण्यासाठी ओढ्यावरील सिद्धिविनायक मंदिराशेजारी थांबली होती. त्यानंतर ती पुढे उमा चित्रमंदिराकडे जात होती. त्याचवेळी चालकाला पाय बसच्या ‘अ‍ॅक्सिलरेटर’वर राहिल्यामुळे अचानक बसचा वेग प्रचंड वाढला. काही क्षणांतच बस उमा चित्रमंदिरच्या सिग्नल चौकात थांबलेल्या सर्व वाहनांना पाठोपाठ धडक देत वेगाने पुढे धावत सिग्नल चौकातील काश्मीर कोल्ड्रिंक हाऊसच्या दारातील विजेच्या खांबावर जोरात धडकून थांबली. हे अंगावर शहारे आणणारे थरारक दृश्य होते. खांबाजवळ थांबलेल्या दोघा पोलिसांपैकी राजाराम पाटील या मुख्यालयातील कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसास या बसची धडक लागली; तर दुसरे सहायक फौजदार राजाराम शामराव कुंभार हे तेथून बाजूला धावल्याने बचावले. दुर्घटनेत सिग्नलसाठी थांबलेली सर्व वाहने काही क्षणांतच एकापाठोपाठ बसखाली चिरडल्याने त्यांचा चक्काचूर झाला; तर वाहनधारकांनाही वाहनांसह चिरडले. त्यामुळे परिसरात एकच हाहाकार माजला. ज्यावेळी बस खांबाला धडकून थांबली, त्यावेळी चालक रमेश कांबळे हा बेशुद्धावस्थेत बसच्या स्टिअरिंगवर डोके ठेवून पडला होता. रस्त्यावर अनेकजण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते; तर काहींची हालचाल बंदच होती.

उचगाव परिसरात हळहळ व्यक्त
उचगाव : शिवनेरी कॉलनी येथील सुहास युवराज पाटील (वय २०) यांच्या अपघाती निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सुहास पाटील हा संजीवनी कॉलेज, पन्हाळा येथे कॉम्पुटर सायन्सच्या तृतीय वर्षात शिकत होता. त्याच्या पश्चात आई-वडील व एक बहीण असून ती बी. ई.मध्ये शिकत आहे. दोघेही कॉलेजला एकत्र जात होते. गेले दोन दिवस आई, वडील, बहीण गावाकडील नातेवाइकांच्या लग्नाला गेले होते. तर सुहासही त्यांच्यासोबत लग्नाला गेला होता. काम असल्याने कोल्हापूरला जाऊन येतो असे सांगून तो घरी उचगाव येथे आला होता. काम आटोपून सांयकाळी तो दुचाकीवरून गावी जात असतानाच अपघातात त्याचा मूत्यू झाला. त्याच्या वडिलांचा गोकुळ शिरगाव, एमआयडीसी येथे मशिन्स शॉपचा कारखाना आहे. अपघाताची माहिती कळताच त्या सर्वांनीच सीपीआर हॉस्पिटल येथे त्याच्या मित्रांनी मोठी गर्दी केली होती.

रस्त्यावर रक्ताचा सडा, वाहनांचे सुटे भाग, डिझेल
दुर्घटनास्थळी अनेक वाहनांचा या बसखाली सापडून चक्काचूर झाल्याने त्यांचे सुटे भाग संपूर्ण चौकात पसरले होते; तर ठिकठिकाणी रक्ताचे सडे पडले होते, तर एस. टी. बसचा टँक फुटल्याने त्यातील डिझेल रस्त्यावर पसरल्याचे विदारक दृश्य दिसत होते. दुर्घटनेनंतर मृत आणि जखमींना नागरिकांनी तातडीने काही रिक्षांतून सीपीआर रुग्णालयात हलविले. रस्त्यावर पसरलेल्या या डिझेलवर नागरिकांनी माती व शेजारील दुकानातील चॉकपीट टाकले.


हुपरी-रंकाळा एस.टी. बस
हुपरीतून निघालेली बस कोल्हापूर शहरात आल्यानंतर पार्वती चित्रमंदिरामार्गे, उमा चित्रमंदिर, सुभाष रोड मार्गे दसरा चौक, तोरस्कर चौक, गंगावेश मार्गे रंकाळा असा या एस.टी. बसचा मार्ग होता; पण पार्वती चित्रमंदिराच्या पुढे सिद्धिविनायक मंदिरानजीक थांब्यावर काही प्रवासी उतरल्यांनतर अवघ्या १०० मीटर अंतरावर उमा चित्रमंदिर चौकातच या बसला सायंकाळी ५.४५ वाजता भीषण दुर्घटना घडली.


गर्दीची वेळ अन् दुर्घटना
सायंकाळी सर्व कार्यालये सुटल्यामुळे संपूर्ण शहरातच सायंकाळी वाहनधारकांची गर्दी होती. त्याचप्रमाणे उमा चित्रमंदिराच्या चौकातही मोठ्या संख्येने वाहने सिग्नल चौकात थांबून होती. हिरवा दिवा लागण्याची प्रतीक्षा करीत थांबलेल्या वाहनचालकांवर पाठीमागून काळाने घाला घातला. हीच एस.टी. बस पाठोपाठ थांबलेल्या वाहनांना चिरडत पुढे आली. ती थोडी डाव्या बाजूला वळल्याने चौकातील कोल्ड्रिंक हाऊसच्या खांबावर आदळली. ती आणखी वळली असती तर सावित्रीबाई फुले हॉस्पिटलकडून येणाऱ्या रस्त्यावर सिग्नलसाठी थांबलेल्या वाहनांत घुसली असती व मोठा अनर्थ घडला असता.


पालकमंत्री, महापौर, जिल्हाधिकारी, विशेष पोलीस महानिरीक्षकांची भेट
दुर्घटनास्थळी आणि सीपीआर रुग्णालयात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, महापौर हसिना फरास, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी घटनास्थळी आणि सीपीआरमध्ये भेट देऊन पाहणी केली.
रुग्णालयात जखमींची विचारपूस केली. तसेच करवीर प्रांताधिकारी व एस. टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी पालकमंत्री पाटील यांनी चर्चा करून मृत आणि जखमींच्या नातेवाइकांना जास्तीत-जास्त मदत करावी अशा सूचना दिल्या. याशिवाय दुर्घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, शहर पोलीस उपअधीक्षक प्रशांत अमृतकर तसेच पोलीस निरीक्षक निशिकांत भुजबळ, तानाजी सावंत, वाहतूक पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी भेट देऊन परिस्थिती आटोक्यात आणली.

जिवाची पर्वा न करता बस रोखण्याचा प्रयत्न
पोलीस हवालदार राजाराम पाटील हे मुख्यालयात नोकरीस आहेत. वाहतूक शाखेच्या वतीने त्यांची बुधवारी उमा टॉकीज चौकात वाहनांची तपासणी करण्यासाठी ड्यूटी होती. सिग्नल सुरू असतानाच भरधाव एस. टी.ने वाहनांना उडवीत दोघांना चिरडताच आरडाओरड झाली. समोर भयानक दृश्य पाहून पाटील यांनी जिवाची पर्वा न करता एस. टी. बस रोखण्यासाठी प्रयत्न केले असता धक्का लागून ते जखमी झाले.



एस. टी.चालक रमेश कांबळे याच्यावर ‘सीपीआर’मध्ये उपचार सुरू आहेत. त्याला हृदयविकाराचा धक्का आला की त्याने मद्यप्राशन केले होते, हे आम्ही आता सांगू शकत नाही. त्याच्या सर्व तपासण्या करून आज रिपोर्ट दिला जाईल.
-डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय



चालकाबद्दल तक्रारी
अपघातग्रस्त एस.टी.चे संभाजीनगर डेपोचे चालक रमेश कांबळे याचे नोकरीतील वर्तनही चांगले नसल्याची चर्चा अपघातस्थळी होती. तो कामावर नियमितपणे येत नसे.
चालक बिनधास्त
सर्व भयानक दृश्य तो ‘सीपीआर’मध्ये डोळ्यांसमोर पाहत होता. या दुर्घटनेचा त्याच्या चेहऱ्यावर कोणताच परिणाम दिसत नव्हता. बिनधास्तपणे तो सीपीआर आवारात वावरत होता. काही वेळाने पोलिसांनी त्याला चौकीत नेले.

Web Title: STs strike to 14 vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.