कोल्हापुरातील एसटी कार्यशाळेचे स्थलांतर, नवे ठिकाण तापदायक
By पोपट केशव पवार | Published: June 18, 2024 04:06 PM2024-06-18T16:06:48+5:302024-06-18T16:07:20+5:30
ताराबाई पार्कात कार्यशाळा गोकुळ शिरगावला हलविली
पोपट पवार
कोल्हापूर : गेल्या ६१ वर्षांपासून कोल्हापूर शहरातील ताराबाई पार्कात आरटीओ कार्यालयाशेजारी कार्यरत असलेले एस.टी.महामंडळाचे वर्कशॉप गोकुळ शिरगाव येथील महामंडळाच्या जागेत पंधरा दिवसांपूर्वी हलविण्यात आले आहे. मात्र, नव्या जागेत मुलभूत सुविधांची वानवा असताना महामंडळाने घेतलेला हा तडकाफडकी निर्णय कर्मचाऱ्यांसाठी तापदायक ठरू लागला आहे.
नव्या ठिकाणी पुरेशे पाणीही मिळत नसून याबाबत आवाज काढला तरी कर्मचाऱ्यांवर कारवाईची भीती दाखवली जात आहे. त्यामुळे कर्मचारी हवालदिल झाले आहेत. कोल्हापुरातील ताराबाई पार्कात ३ मार्च १९६३ मध्ये एस.टी.महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेची उभारणी करण्यात आली. या वर्कशॉपमध्ये परिवहन महामंडळाच्या बसेसची देखभाल, दुरुस्ती करण्यात येते. यासाठी ३०० कर्मचारी कार्यरत होते.
मात्र, हे वर्कशॉप महामंडळाच्या गोकुळ शिरगाव येथील जागेत नुकतेच स्थलांतरित करण्यात आले. नव्या ठिकाणी मुलभूत सुविधा नसताना ते स्थलांतरित करण्याची इतकी घाईगडबड का केली, फॅक्टरी इनस्पेक्शन होण्याआधीच वर्कशॉप का हलविले असा सवाल कर्मचाऱ्यांमधून उपस्थित होत आहे.
घरभाडे भत्त्यातही नुकसान
ताराबाई पार्कात असलेल्या वर्कशॉपमध्ये ३०० कर्मचारी कार्यरत होते. येथे या कर्मचाऱ्यांना शहरीप्रमाणे १६ टक्के घरभाडे भत्ता मिळत होता. मात्र, वर्कशॉप स्थलांतरित केल्याने या भत्त्यात ८ टक्क्यांनी कपात केली आहे. एका कर्मचाऱ्याचे दोन ते पाच हजार रुपयांचे नुकसान होणार आहे. हे वर्कशॉप स्थलांतरित करताना कर्मचाऱ्यांच्या आर्थिक नुकसानीचा कुठलाही विचार गृहित धरलेला नाही. त्यामुळे सर्वच कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.
महामंडळाच्या दुर्लक्षपणामुळे जागा गेली
एस.टी.महामंडळाची गोकुळ शिरगाव एमआयडीसी येथील २५ टक्के जागा केवळ महामंडळाच्या दुर्लक्षामुळे खासगी मालकांनी बळकावली असून महामंडळाला जाग आल्यानंतर त्यांनी येथे वर्कशॉप बांधले असल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांतून होत आहे.
कर्मचाऱ्यांवर दबाव
हे वर्कशॉप का स्थलांतरित केले याबाबत वरिष्ठांना विचारण्याचीही कर्मचाऱ्यांना सोय राहिलेली नाही. नव्या ठिकाणी होणाऱ्या गैरसोयीबाबत विचारणा केल्यास थेट कारवाईची धमकी दिली जात आहे. त्यामुळे कर्मचारी मानसिक तणावात असल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले.
वर्कशॉप स्थलांतरित करण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वीच घेतला हाेता. त्यानुसार गेल्या दोन वर्षांपासून गोकुळ शिरगावमध्ये वर्कशॉप इमारतीचे काम सुरु होते. हे काम पूर्ण झाल्याने वर्कशॉप स्थलांतरित केले आहे. वर्कशॉपसाठी नवी इमारत मिळाल्याने एस.टी. महामंडळ व कर्मचाऱ्यांची सोयच झाली आहे. - यशवंत कानतोडे, यंत्र अभियंता,एस.टी.महामंडळ, वर्कशॉप