अट्टल घरफोड्यास कोल्हापुरात अटक
By admin | Published: May 26, 2014 01:12 AM2014-05-26T01:12:52+5:302014-05-26T01:13:06+5:30
जुना राजवाडा पोलिसांची कारवाई : ३० फ्लॅट फोडून दीड किलो सोने लंपास केल्याची कबुली
कोल्हापूर : शहरात भरदिवसा अपार्टमेंटमधील बंद फ्लॅट फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास करणार्या अट्टल चोरट्यास जुना राजवाडा पोलिसांनी आज, रविवारी दुपारी एकच्या सुमारास चित्तथरारक पाठलाग करून शिताफीने अटक केली. संशयित राजू प्रकाश नागरगोजे ऊर्फ राजवीर सुभाष देसाई (वय २७, रा. उचगाव-गडमुडशिंगी, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. त्याने शहरात जुना राजवाडा, करवीर, शाहूपुरी, राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३० फ्लॅट फोडून सुमारे दीड किलो सोन्याचे दागिने लंपास केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी सांगितले, सानेगुरुजी वसाहत येथील तुळजाभवानी मंदिर परिसरात फ्लॅटमध्ये दिवसा घरफोडी झाली होती. याचा तपास पोलीस कॉन्स्टेबल मोहन गवळी करताना ही घरफोडी पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार राजू नागरगोजे याने केल्याची माहिती खबर्याने दिली. त्यानुसार ते त्याच्या मागावर होते. आज, रविवारी दुपारी अकराच्या सुमारास तो मध्यवर्ती बसस्थानक येथील कॅडसन फोटो स्टुडिओसमोर मित्रास भेटण्यास येणार असल्याची माहिती गवळी यांना दोन दिवसांपूर्वी खबर्यानदिली होती. नागरगोजे हा पोलिसांना चकवा देण्यात हुशार होता त्यामुळे पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी त्याला सापळा लावून अटक करण्याचा बेत आखला. वेशांतर करून अटक राजू नागरगोजे हा अकराच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानक येथे येणार असल्याने सकाळी नऊच्या सुमारास फोटो स्टुडिओच्या समोर सापळा लावण्यात आला. पोलीस निरीक्षक मोहिते स्वत: सलवार कमीज घालून परिसरात फिरत होते. पोलीस उपनिरीक्षक इंद्रजित सोनकांबळे आंबे विक्रेत्याजवळ आंबे विकण्यास बसले तर इतर सहकार्यांनी चहाटपरीवर चहा पिण्याचा बनाव केला. साडेअकराच्या सुमारास नागरगोजे याठिकाणी आला. त्याने जिन्स पँट, चौकडा शर्ट, डोक्याला टोपी, डोळ्यावर गॉगल व खांद्याला सॅक अडकवली होती. त्याच्या बारीक हालचालींवर पोलीस लक्ष ठेवून होते. तो स्टुडिओमध्ये न जाता अचानक एका रिक्षामध्ये बसून निघाल्यावर पोलीस कॉन्स्टेबल भरत कांबळे व राहुल महाजन यांनी त्याच्या दिशेने धाव घेतली. पोलीस आल्याची चाहूल लागताच त्याने तेथून काढता पाय घेत परिख पुलाच्या दिशेने तो पळत सुटला. पोलीस त्याच्या मागे धावत सुटले. अखेर थरारक पाठलाग करत शाहूपुरी दुसर्या गल्लीमध्ये कांबळे व महाजन यांनी झडप घालून त्याला पकडले. पोलिसी खाक्या दाखवत त्याला जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आणले. याठिकाणी त्याने शहरात सकाळी ११ ते २ यावेळेत आपण तब्बल ३० पेक्षा जास्त घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यामध्ये आतापर्यंत त्याने दीड किलो सोन्याचे दागिने लंपास केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. उद्या, सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यानंतर त्याने शहरात कोणत्या परिसरात घरफोड ्या केल्या तेथील चोरलेले दागिने कुठे ठेवले, कोणाला विक्री केले याचा उलगडा होईल.े राजू नागरगोजेचे ‘आई’वर प्रेम नागरगोजे याच्यावर चेन स्नॅचिंग, घरफोडी, लूटमार, अपहरण आदी गुन्हे आहेत. त्याला यापूर्वी २००६ मध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली होती. त्यानंतर त्याने २४ जानेवारी २०१४ रोजी गांधीनगर येथील प्रसिद्ध व्यापार्याचा मुलगा चिराग चूघ (वय ५) याचे अपहरण केले होते. त्यातून १४ लाखांची खंडणी वसूल करून तो फरारी होता. गांधीनगर व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस त्याचा शोध घेत होते. गेली चार महिने तो पोलिसांना चकवा देत शहरात भरदिवसा घरफोड्या करत असताना अखेर जुना राजवाडा पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. नागरगोजे हा दहावी नापास आहे. तो आई व पत्नीसोबत राहत असे; परंतु अपहरण प्रकरणापासून तो पसार झाला होता. राजवीर देसाई हे टोपणनाव लावून काही ठिकाणी तो वावरत असे. त्याने आपल्या मानेवर ‘आई’ असे गोंदून घेतले आहे. त्याला या नावात काय दडलंय, असे पोलिसांनी विचारले असता माझे ‘आई’वर प्रेम आहे. वडील लहानपणी वारल्याने आईने मला मोठे केल्याचे त्याने सांगितले.